शिवसेनेच्या वतीने स्वागत व सत्कार सोहळा
यवतमाळ - महाराष्ट्र राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री ना. संजय राठोड हे मंत्रिपद स्वीकारल्यानंतर उद्या दि.२५ डिसेंबर रोजी प्रथमच यवतमाळ येथे येत आहे. त्यानिमित्त शिवसेनेच्या वतीने त्यांचा भव्य स्वागत व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
मंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर ना. संजय राठोड यांचे प्रथमच यवतमाळ शहरात आगमन होत आहे. त्यामुळे त्यांचे स्वागत व सत्कार करण्याकरीता जिल्हाभरातून शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते दुचाकी व चारचाकी वाहनाने येणार आहेत. ना. संजय राठोड हे नागपूर मार्गे सकाळी १० वाजता यवतमाळ शहरात दाखल होणार आहेत. नागपूर येथून राष्ट्रीय महामार्गाने आर्णी रोडवरील वनवासी मारुती मंदीर चौकात पोहोचल्यानंतर ना. संजय राठोड हे हनुमान मंदिरात पूजन करतील. त्यानंतर तेथेच असलेल्या संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण, तेथून आर्णी नाका परिसरात क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या पुतळ्यास माल्यार्पण व अभिवादन, तेथून जिल्हा परिषदेच्या आवारात असलेल्या कै. वसंतराव नाईक यांच्या पुतळयाला माल्यार्पण व अभिवादन, गार्डन रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास माल्यार्पण व मानाचा मुजरा, त्यानंतर संविधान चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण व अभिवादन करतील. तेथून तहसील चौक मार्गे म्युनसिपल हायस्कूल परिसरात अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करतील. त्यांनतर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास माल्यार्पण व अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयात बचत भवन येथे त्यांचे आगमन होईल.
या ठिकाणी जिल्हाभरातून आलेले शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, चाहते यांच्या वतीने ना. संजय राठोड यांचे स्वागत व सत्कार समारंभ होणार आहे.
0 Comments