जिल्ह्यातील विविध विभागांची रिक्त पदे प्राधान्याने भरणार - मंत्री संजय राठोड
मृद व जलसंधारण मंत्र्यांची अधिकाऱ्यांसोबत चर्चा
यवतमाळ : जिल्ह्यात महसूलसह विविध विभागाची अनेक पदे रिक्त आहे. त्यामुळे कामे करतांना अडचणी निर्माण होता. येत्या काही दिवसात रिक्त पदांचा आढावा घेऊन माहिती द्या. ही रिक्त पदे भरण्याला आपले प्राधान्य राहणार असून त्यासाठी मंत्रालयात प्रत्येक विभागाकडे वैयक्तिक पाठपुरावा करू, असे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी सांगितले.
महसूल भवन येथे मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक पियुष जगताप, निवासी उपजिल्हाधिकारी सुदर्शन गायकवाड यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जलसंधारणाच्या क्षेत्रात लोकसहभागातून भरीव काम करण्यासाठी विभागाच्यावतीने राज्यस्तरावर भव्य पाणलोट यात्रा काढण्यात येणार आहे. ही यात्रा 1 हजार 600 गावांना कव्हर करतील. यात विद्यार्थी, तरुण, विविध सामाजिक संघटना, लोकसहभाग, समाजातील विविध घटक तसेच नाम व पाणी फाऊंडेशन सारख्या नामवंत सामाजिक संस्थांचा सहभाग घेतला जाणार आहे. लवकरच या यात्रेचा आराखडा अंतिम होणार असल्याचे श्री.राठोड यांनी सांगितले. पाणलोट यात्रेत सामाजिक संस्थांसह विविध शासकीय विभागांचा देखील सहभाग घेतला जाणार आहे. जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी तर विभागीय स्तरावर उपविभागीय अधिकारी यात्रा समितीचे अध्यक्ष राहणार आहे. आपल्या जिल्ह्यात ही यात्रा अधिक उत्तमपणे पार पाडण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना देखील मंत्री श्री.राठोड यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
मृद व जलसंधारण विभागाच्यावतीने 660 पदांची भरती प्रक्रिया सुरु आहे. अजून 3 हजार नवीन पदे भरण्यात येणार आहे. जिल्ह्यातील महसूलसह विविध विभागाची रिक्त पदे भरण्याला आपले प्राधान्य राहणार आहे. त्यासाठी विविध विभागांच्या रिक्त पदांचा आढावा घेऊन सादर करावा, असे त्यांनी सांगितले.
जिल्हा प्रशासनाच्यावतीने स्वागत
महसूल भवन येथे बैठकीच्या सुरुवातीस मंत्री संजय राठोड यांचे प्रशासनाच्यावतीने स्वागत करण्यात आले. अप्पर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक पियुष जगताप, निवासी उपजिल्हाधिकारी सुदर्शन गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, समाजकल्याणच्या सहाय्यक आयुक्त मंगला मून यांच्यासह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
0 Comments