लोकसेवा आयोगाच्या परिक्षांचे वेळापत्रक जाहीर


 

यवतमाळ : राज्य शासनाच्या सेवेतील विविध पदे राज्य लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येतात. सन 2025 या वर्षातील विविध पदांच्या आगामी परिक्षांचे वेळापत्रक आयोगाने जाहीर केले आहे. विविध परिक्षांचे नियोजन करतांना उमेदवारांना सोईचे व्हावे, यासाठी सदर वेळापत्रक उपयुक्त ठरणार आहे.

वेळापत्रकानुसार दि.5 जानेवारी रोजी महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षा होणार आहे. यामध्ये सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, दुय्यम निबंधक श्रेणी-1, मुद्रांक निरीक्षक या पदांसाठी परिक्षा होईल.

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षा दि.2 फेब्रुवारी रोजी होणार आहे. उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, तांत्रिक सहायक, कर सहायक, बेलिफ व लिपीक, लिपीक-टंकलेखक, सहायक मोटार वाहन निरीक्षक या पदांचा यामध्ये समावेश आहे. दि.16 मार्च रोजी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर व न्यायदंडाधिकारी या पदासाठीची पूर्व व मुख्य परीक्षा घेण्यात येईल. राज्य सेवा मुख्य परीक्षा दि.26, 27 व 28 एप्रिल रोजी एकुण 35 संवर्गासाठी घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा दि.10 ते 15 मे रोजी सहाय्यक वनसंरक्षक व वनक्षेत्रपाल या पदांसाठी घेतली जाईल.

महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा सहाय्यक कार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता, उपविभागीय जलसंधारण अधिकारी, जलसंधारण अधिकारी या पदांसाठी दि.18 मे रोजी घेतली जाईल. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा राज्य सेवा 35 संवर्ग, यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा, विद्युत अभियांत्रिकी सेवा, स्थापत्य अभियांत्रिकी, कृषि सेवा, सहाय्यक नियंत्रक लेखापाल, अन्न व औषध प्रशासकीय सेवा, वनसेवा यासाठी दि.28 सप्टेंबर रोजी होईल.

राज्य सेवा मुख्य परीक्षा, महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा, विद्युत अभियांत्रिकी मुख्य परीक्षा, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा, महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा, अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा, निरीक्षक वैधमापन शास्त्र मुख्य परीक्षा, महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा या परिक्षांच्या तारखा स्वतंत्रपणे जाहिर करण्यात येणार आहे.

दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व व मुख्य परीक्षा दि. 12 ऑक्टोबर रोजी होणार आहे. महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षा सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्य कर निरिक्षक, पोलिस उप निरिक्षक, दुय्यम निरिक्षक, मुद्रांक निरिक्षक या पदांसाठी दि.9 नोव्हेंबर होईल.

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षा उद्योग निरिक्षक, दुय्यम निरिक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक, बेलिफ व लिपिक, लिपिक-टंकलेखक, सहाय्यक मोटर वाहन निरिक्षक या पदांसाठी घेण्यात येईल. सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा दि.30 नोव्हेंबर ला होणार असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अवर सचिव र. प्र. ओतारी यांनी कळविले आहे.

Post a Comment

0 Comments