वितरण हानी कमी करुन १००% वीजबिल वसूली करण्याचे निर्देश; अमरावती परिमंडळाचा घेतला आढावा
यवतमाळ : केंद्र शासनाच्या 'इझ ऑफ लिव्हिंग' (राहणीमान सुलभता) अभियानानुसार वीज ग्राहकांना राज्य वीज नियामक आयोगाने निश्चित केलेल्या मानकानुसार उत्तम सेवा देणे आणि त्या सेवेत सातत्य राखणे ही महावितरणची जबाबदारी आहे, हे लक्षात घेऊन काम करा. वितरण हानी कमी करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करणे, ग्राहक सेवेमध्ये गुणात्मक सुधारणा करणे, ग्राहकाभिमूख विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करतांना परिमंडळात १००% वीजबिल वसुली करण्याचे निर्देश महावितरणचे संचालक (संचालन)श्री अरविंद भादीकर यांनी दिले.
विद्युत भवन येथे झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.यावेळी मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी,अधीक्षक अभियंते दीपक देवहाते (अमरावती) , प्रवीण दरोली (यवतमाळ), दिपाली माडेलवार (पायाभूत आराखडा) यांच्यासह परिमंडळ कार्यालयाचे सर्व विभागप्रमुख,सर्व कार्यकारी अभियंते,व्यवस्थापक वित्त व लेखा,अमरावती शहर विभागातील उपविभागीय अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हानिहाय आढावा घेतांना संचालक (संचालन) भादीकर म्हणाले की,वितरण हानी कमी करण्यासाठी महावितरणने ठरवून दिलेल्या कृती आराखड्यानुसार काम होणे आवश्यक आहे. त्यामध्ये प्रामुख्याने ग्राहकांना वापरानुसार अचूक वीजबिल देणे, ग्राहकांचे नादुरुस्त मीटर बदलणे, वीज चोरीला आळा घालण्यासाठी नियमित ग्राहक -मिटर तपासणी मोहिम राबविणे , वीज चोरी असलेल्या क्षेत्रात इन्सुलेटेड वीज वाहिनीचा वापर करणे, ग्राहकांना तत्काळ वीज जोडणी देणे, ग्राहकांच्या खंडित वीजपुरवठा, देयक दुरुस्ती इत्यादी तक्रारींचे त्वरित निवारण करणे, आदीचा समावेश आहे.
तथापि, विज गळती कमी करण्याच्या दृष्टीने यावर्षी अमरावती जिल्ह्यात ११ हजार २४३ आणि यवतमाळ जिल्ह्यात ६ हजार ७६० नादुरुस्त मिटर बदलण्याचे काम सोडले तर वीज चोरीला आळा घालण्यासाठी नियमित तपासणी मोहीम राबवणे, वीज चोरी पकडणे, FIR दाखल करणे, अत्यल्प तसेच सरासरी वीज बिल असलेल्या ग्राहकांची तपासणी करणे, याबाबत विशेष प्रयत्न झाले नसल्याने संचालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित ग्राहकांसाठी महावितरण कंपनीने "अभय योजना" जाहीर केलेली असून त्यामध्ये संपूर्ण व्याज व विलंब आकाराची माफी असतांनाही ग्राहकांच्या प्रतिसाद समाधानकारक नसल्याने सर्व थकबाकीदार पीडी ग्राहकांची प्राधान्याने तपासणी करणे,अनाधिकृत वीज पुरवठा आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करणे, जर अन्य ग्राहकाच्या नावाने त्या जागेवर नविन कनेक्शन दिलेले आढळल्यास जुनी थकबाकी त्या नवीन ग्राहकांकडे वळती करणे , तसेच विभागवार पथके तयार करून वीज चोरी पकडणे, पी डी ग्राहकाच्या ठिकाणी विजेचा वापर होत नसल्यास अथवा संबंधित इमारत ढासळली असल्यास सदर जागेवर महावितरणची थकबाकी असेल तर त्या जागेवर महावितरणची थकबाकी भरणे जुन्या किंवा नवीन ग्राहकावर बंधनकारक असल्याचे स्पष्ट सूचनाफलक लावण्याचे निर्देश त्यांनी दिले.
महावितरणने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयामुळे प्रत्येक वीज वाहिनीला लावण्यात आलेल्या अत्याधुनिक मीटरमुळे २४x७ माहिती उपलब्ध होत आहे. त्यानुसार विशिष्ट कालावधीमध्ये विशिष्ट वाहिनीचा किंवा भागाचा वीज पुरवठा किती वेळा खंडित झाला याची माहिती थेट वरीष्ठ कार्यालयाला उपलब्ध होणार असल्याने वीज खंडित होण्याच्या घटना यापुढे कमी होऊन याचा फायदा सुरळीत वीज पुरवठ्यासाठी होणार आहे.
केंद्र शासनाच्या "इज ऑफ लिविंग" अभियानानुसार सर्व नवीन वीज जोडण्या विहित मुदतीत देण्याचे निर्देश त्यांनी दिले, मुदतीनंतर विज जोडणी दिल्याचे आढळल्यास लागू असलेला दंड यापुढे दोषी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली. तसेच पायाभूत सुधारणांशी संबंधित प्रधानमंत्री सुर्यघर मोफत वीज योजना,मागेल त्याला सौर कृषी पंप योजना,मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना,सौर ग्राम योजनांचा सविस्तर आढावा घेत श्री अरविंद भादीकर यांनी दिलेल्या उद्दिष्टनुसार काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
0 Comments