यवतमाळ नगर परिषद कचऱ्यातही घोटाळा : आ. बाळासाहेब मांगुळकर यांनी घेतला आढावा


यवतमाळ : नगर परिषदेमध्ये प्रचंड अनागोंदी कारभार होत असल्या कारणाने येथे सिओ थांबायलाच तयार नसतो. सिओंच पुर्ण काळ करू  शकत नसल्यामुळे या नगर परिषदेमध्ये भ्रष्टाचाराला वाव मिळाला आहे. आणि सिओंच्या आदेशानुसार कामे होत असले तर त्याला येथे काम करू द्यायचे नाही. त्यामुळे यवतमाळ नगर परिषद मागील काळात प्रचंड भ्रष्टाचारामध्ये दबलेली असल्याने  याचा आढावा घेवून योग्य पध्दतीने विकासाची कामे व्‍हावी, या दृष्टीने आज विश्रामगृहावर नवनिर्वाचीत आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी बैठक बोलावली होती.

बैठकीच्या सुरुवातीला आ. बाळासाहेब मांगुळकर यांचा सिओंकडून  शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.त्यानंतर विविध विषयावर चर्चा झाली. यामध्ये लगतच्या ग्रामपंचायती नगर परिषदेमध्ये समाविष्ट करण्यात आल्या होत्या. समाविष्ट झाल्यानंतर तीन वर्षे कर भरल्या जाणार नाही असा ठराव घेण्यात आला होता. मात्र कर सुरू झाला. ज्या पध्दतीने टॅक्सची वसुली करण्यात आली. त्याप्रमाणात त्या भागाचा विकास झाला नसल्याचे आ. मांगुळकर यांनी सीओ शुभम क्यतमवार यांच्या लक्षात मुद्दा आणून दिला. आणि चुकीचा सर्वे झाला असेल तर फेर सर्वे करण्याचे आदेशही दिले. त्यानंतर दैनिक वसुलीबाबत संतोष बोरेले यांनी प्रश्न विचारला असता साधारण यामधुन ९१ लाख रुपये उत्पन्न न.प.ला मिळायला पाहिजे असते असे अधिकारी म्हणाले. मात्र ३४ लाख रुपयच वसुल झाल्याने विकासकामावर परिणाम झाला. तसेच दैनिक वसुलीची टेंडर प्रक्रिया किचकट असल्यामुळे ठराविकच कंत्राटदार टेंडर भरू शकतात.त्यामुळे ही प्रक्रिया सोपी करण्यात यावी, जेणेकरून सर्वसामान्य कंत्राटदाराला टेंडर भरणे सोयीस्कर जाईल. यातून बेरोजगारीचाही प्रश्न सुटू शकतो असे आ. मांगुळकर म्हणाले. नुकताच नवनिर्वाचीत आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्या वाढदिवसाचे बॅनर यवतमाळ शहरात लावण्यात आले होते. मात्र एकाच दिवसात हे बॅनर नगर परिषदेतर्फे काढण्यात आले. यावर बाळासाहेबांनीही सीओ यांची कानउघाडणी करून इतरांचे बॅनर आठ-आठ दिवस ठेवता यापुढे असे व्‍हायला नको. 

कोरोना काळामध्ये व्‍यवसाय बंद असल्याने नगर परिषदेचे गाळेही बंद होते. व्यवसाय बंद असतांनाही भाडे आकारण्यात आले. भाडे थकीत झाल्यामुळे त्यावर व्याज लावण्यात आले. हा प्रकार चुकीचा असल्याचे ओम तिवारी म्हणाले. तसेच बांधकामाबाबतचा विषय वैशाली सवाई यांनी छेडला असता नगर परिषदेतर्फे भाजपातील मर्जीच्याच कंत्राटदारांना कामे दिल्या जाते. असा आरोप त्यांनी यावेळी केला. यापुढे विकासाची कामे ठराविक कंत्राटदाराला न देता सगळ्यांसाठी खुली करावी, त्यामधून बेरोजगार कंत्राटदारांना रोजगार मिळेल आणि त्यामधुन त्यांना दिलासा मिळेल, असे मांगुळकर म्हणाले.

ज्या हेडसाठी निधी येतो त्याच हेडवर खर्च करण्यात यावा, दुसरीकडे तो वळविण्याचा प्रयत्न करू नये, असा सज्जड दम संतोष बोरेले यांनी सीओ यांना दिला. दलित वस्तीचा निधी दुसऱ्या हेडवर वळविल्याने त्या ठिकाणचा विकास झाला नाही. अशाप्रकारे विकास कुठे आहे, असा सवाल बोरेले यांनी यावेळी केला. प्रभाग १० मधील ड्रेनलाईनचे काम न करताच १० लाखाचे बिल काढण्यात आले. याबाबत चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी ओम तिवारी यांनी केली.

शहरात पार्किंगची मोठी समस्या असल्याने उपाययोजना करण्यात यावी, अशा सुचना देण्यात आल्या. बाळासाहेब ज्या दिवशीपासून आमदार झाले त्या दिवशीपासून शहरामध्ये घंटागाड्या आठ-आठ दिवस फिरत नाही. त्यावर सीओ म्हणाले की, घंटागाड्यांची दुरुस्ती सूरू आहे, दुरूस्तीचे काम कंत्राटदाराकडे असल्याने त्यांना लवकरात लवकरात काम करण्याचे आदेश द्यावे, नाही तर नोटीस बजावा, असे आदेश बोरेले यांनी सीओ यांना दिले. कंत्राटदारावर वचक नसल्याने बोगस बिले काढले जातात. घंटागाड्यावर हेल्पर नसतात. त्यांचा पगार परस्पर नगर परिषद हडपते असाही आरोप करण्यात आला. तसेच सफाई कामगारांचे दोन-दोन महिने पगार होत नाही. ५०० सफाई कामगारांची आवश्यकता असतांना २०० कर्मचाऱ्यांवरच यवतमाळचा भार दिला जातो. ३०० सफाई कामगारांचे पैसे कुठे जातात, कर्मचारी आठ तास काम करतो मात्र त्याला ४ तासाचेच पैसे दिल्या जाते. तसेच त्यांना कुठल्याच सोयीसुविधा पुरविल्या जात नाही, याबाबतही कंत्राटदाराला पत्र देऊन समज देण्यात यावा अशा प्रकारे विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी बैठकीला आमदार बाळासाहेब मांगुळकर, संतोष बोरेले, बबलू देशमुख, वैशाली सवाई, ओम तिवारी, विशाल पावडे, अतुल मांगुळकर, नितीन मिर्झापूरे, जाकीर भाई, नंदु कुडमेथे, कमल मिश्रा आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments