नंददीप फाऊंडेशनचे कार्य युवा पिढींसाठी दीपस्तंभ - कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते
अमरावती : संत गाडगे बाबा सामाजिक कार्य पुरस्काराच्या निमित्ताने सामाजिक जाणीव व जागृती लोकांमध्ये निर्माण होत आहे. पुरस्काराकरीता आलेल्या प्रस्तावांमुळे समाजजीवनासाठी कार्य करणारे व्यक्ती आजही कार्यरत आहेत, याचा अभिमान वाटतो. नंददीप फाऊंडेशन करीत असलेले मनोरुग्णांंसाठीचे कार्य निश्चितच युवा पिढींसाठी दीपस्तंभ आहे, असे गौरवोद्गार कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी काढले. 2024 वर्षीचा कै. नागोरावजी जयरामजी मेटकर स्मृतिप्रित्यर्थ दिला जाणारा श्री संत गाडगे बाबा सामाजिक कार्य पुरस्कार यवतमाळ येथील नंददीप फाऊंडेशनला कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांच्या हस्ते ससन्मान प्रदान करण्यात आला, त्याप्रसंगी अध्यक्षीय भाषण करतांना ते बोलत होते. यावेळी नंददीप फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री संदीप शिंदे व संचालक श्री अनंत कौलगीकर यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, गौरव प्रमाणपत्र व दहा हजार रुपयांची रोख देऊन कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी सन्मान केला. व्यासपीठावर प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, दानदात्यांचे प्रतिनिधी व विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.व्ही.एम. मेटकर, नंददीप फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री संदीप शिंदे, संचालक श्री अनंत कौलगीकर, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, रा.से.यो. संचालक डॉ. निलेश कडू, संत गाडगे बाबा अध्यासन केंद्राचे प्रमुख डॉ. दिलीप काळे व जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर उपस्थित होते.
कुलगुरू म्हणाले, स्वत: आणि आपल्या कुटुंबाकडे लक्ष न देता नंददीप फाऊंडेशनचे श्री संदीप शिंदे व त्यांच्या धर्मपत्नी सौ. नंदिनी शिंदे सामाजिक कार्य करीत आहेत. दीनदुबळ्यांसाठी त्यांनी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले आहे. यातूनच ते समाजासाठी जगत आहोत, हेही दिसून येते. ख-या अर्थाने संत गाडगे बाबांचे कार्य श्री संदीप शिंदे यांच्या माध्यमातून आज होत आहे व या माध्यमातून समाजामध्ये सामाजिक कार्याची जाणीवजागृती ते करीत आहेत. नंददीप फाऊंडेशनकडून अशाच प्रकारचे कार्य पुढेही होत राहो, अशा शुभेच्छा देऊन कुलगुरूंनी संस्थेला लवकरच भेट देणार असल्याचेही आश्वस्त केले.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर नंददीप फाऊंडेशनचे संचालक श्री अनंत कौलगीकर आपल्या मनोगतात म्हणाले, सुरुवातीला संघटनात्मक कार्य सुरू केल्यानंतर श्री संदीप शिंदे यांचे कार्य पाहून संस्थात्मक कार्य करण्याचे आम्ही ठऱविले आणि त्यासाठी लागणा-या सुविधा, संसाधने उपलब्ध करुन दिलीत. कोरोना काळात संदीप शिंदे यांनी दीड हजारावर नागरिकांना दररोज जेवण दिले. त्यांचे कार्य पाहूनच मग आम्ही संस्थात्मक कार्याचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले.
व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.व्ही.एम. मेटकर म्हणाले, माजी आमदार बबनराव मेटकर यांनी संत गाडगे बाबांच्या दशसूत्रीनुसार कार्य करणारांचा सन्मान व्हावा, म्हणून 2003 साली हा पुरस्कार सुरू केला. पुरस्काराच्या माध्यमातून सामाजिक ऋण फेडण्याचा त्यांचा हा प्रयत्न होता. विद्यापीठात संत गाडगे बाबांचे अध्यासन केंद्र व्हावे, यासाठीही त्यांनी केलेले प्रयत्न यशस्वी ठरले, असे सांगून नंददीप फाऊंडेशनच्या कार्याची माहिती याप्रसंगी त्यांनी दिली. याप्रसंगी पुरस्कारप्राप्त नंददीप फाऊंडेशनच्या कार्याची माहिती देणारी चित्रफितही सभागृहात दाखविण्यात आली. कर्मयोगी श्री संत गाडगे बाबा, स्व. नागोरावजी व स्व. बबनरावदादा मेटकर यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पार्पण व दीपप्रज्वलन करुन राष्ट्रगीत व विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविकातून कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी नंददीप फाऊंडेशनच्या कार्याची माहिती दिली. सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर यांनी, तर आभार अध्यासन प्रमुख डॉ. दिलीप काळे यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन चांगोले, विविध प्राधिकारिणींचे सदस्य, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, समाजसेवक, विद्यापीठातील सर्व शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुख, अधिकारी, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी तसेच नंददीप फाऊंडेशनचे सदस्य उपस्थित होते.
डॉ. पवित्राताई गडलिंगे कुलकर्णी यांचेकडून नंददीप फाऊंडेशनला एक लक्ष रुपयांची देणगी
मूळच्या भातकुली तालुक्यातील हरताळा या लहानशा गावातील रहिवाशी असलेल्या व सध्या ऑस्ट्रेलिया येथे रसायनशास्त्राच्या संशोधक म्हणून कार्य करणा-या डॉ. पवित्राताई गडलिंगे कुलकर्णी यांनी कार्यक्रमात पुरस्कारप्राप्त नंददीप फाऊंडेशनच्या कार्याची चित्रफित पाहून भारावून गेल्या आणि त्यांच्या सामाजिक कार्याला थोडासा हातभार का होई ना म्हणून त्यांनी नंददीप फाऊंडेशनला एक लक्ष रुपयाची देणगी दिली. कुलगुरूंच्या हस्ते नंददीप फाऊंडेशनला ही मदत प्रदान करण्यात आली.
0 Comments