शुल्क रद्द करण्यासाठी जिल्हाधिका-यांना निवेदन
यवतमाळ : येथील नेहरु स्टेडीयमची दारे सर्व सामान्यांसाठी कायमची बंद करण्यात आली आहे. जिल्हा क्रिडा अधिकारी यवतमाळ यांनी या संदर्भात फलक लाऊन नागरीकांसाठी सुचना प्रकाशित केली आहे. नविन वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून या स्टेडीयम मध्ये सर्वसामान्य नागरीक महिण्याचे शुल्क न भरता आता प्रवेश करु शकणार नाही. या अन्यायाच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते ओम तिवारी यांनी जिल्हाधिका-यांना निवेदन देऊन शुल्क रद्द करण्याची मागणी केली आहे.
यवतमाळ येथील नेहरु स्टेडीयमवर गेल्या अनेक वर्षापासून सर्वसामान्य नागरीक, खेळाडू व्यायाम तसेच वॉकींग करण्यासाठी येतात. सरकारने खेळाडूंना सुविधा मिळावी याकरीता नेहरु स्टेडीयममध्ये अनेक सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहे. या सुविधा उपलब्ध करण्यात आल्यानंतर आतील ट्रॅकमध्ये वॉकींग करण्याकरीता जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयाने काही प्रमाणात शुल्क स्वरुपात रक्कम घेणे सुरु केले आहे. सर्वसामान्य नागरीकांना असा भूर्दंड पडू नये म्हणून बाहेरील ट्रॅक मात्र निशुल्क ठेवण्यात आला. आता मात्र जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयाने स्टेडीयम बाहेर फलक लाऊन दिनांक 1 जानेवारी 2025 पासून क्रिडांगणाच्या बाहेरील परिसरात वॉकिंग ट्रॅक आणि ओपण जीमचा वापर करणारे तसेच इतरत्र फिरणा-या सर्वांना 200 रुपये मासिक शुल्क आकारल्या जाणार असल्याची सुचना प्रकाशित केली आहे. वास्तविक अशा पध्दतीने सर्वसामान्य नागरीकांना शुल्क आकारणे अन्यायकारक असून राज्यात इतरत्र कुठेही असे शुल्क आकारले जात नाही. रनिंग ट्रॅकचा वापर रनिंग तसेच चालण्याकरीता केला जात असेल तर त्याच्या देखभाली करीता शुल्क आकारण्यास आमचा विरोध नाही, मात्र सरसकट इतर ठिकाणी व टाईल्सवर फिरण्यासाठी शुल्क आकारण्यात येऊ नये असे ओम तिवारी यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. याठिकाणी सरकारी कोच असतांना सर्वच खेळाडूंकडून फि घेतली जात असून ती गैर आहे. या परिसरात अनेक वृध्द नागरीक आपल्या लहान मुलांना घेऊन सुरक्षीत असलेल्या नेहरु स्टेडीयमवर येत असतात. आता त्यांचेकडून शुल्क आकारण्याचा निर्णय अन्यायकारक आहे. वास्तविक याठिकाणी येणारी टवाळखोर मुले तसेच त्यांचेकडून मैदानात बाईक चालविली जात असल्यामुळे त्यांचेवर प्रतिबंध लावण्यासाठी सरसकट शुल्क घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. गुंडांवर कारवाई करण्याचे सोडून अशा पध्दतीने सर्वसामान्य नागरीकांना वेठीस धरणे गैर आहे. हे शुल्क रद्द न केल्यास उपोषण आंदोलन करण्याचा इशारा ओम तिवारी यांनी दिला आहे. निवेदन देताना ओम तिवारी शहर काँग्रेस कमिटी कोषाध्यक्ष, नंदूभाऊ कुडमेथे, अब्दुल गफ्फार दूंगे, दत्ता हाडके, ऍड.जयसिंग चौहाण, सुनील बोरकर, आकाश गायकवाड, विराग मेश्राम, जीवन शेडके, नवनीत महाजन, विजय लाखानी, भालचंद्र शेडके, संतोष भगत, इम्रान खान उपस्थित होते.
लोकप्रतिधींना विश्वासात घ्या
शहरातील नागरीकांचे प्रतिनिधीत्व स्थानिक आमदार करीत असल्यामुळे त्यांना विश्वासात घेऊन अशा पध्दतीचे निर्णय घेतले जावे. याकरीता जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयाला सुचना देण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. दिनांक 1 जानेवारी पासून सर्वसामान्य नागरीकांसाठी बाहेरील बाजुस फिरण्याकरीता लागु करण्यात येणारे शुल्क रद्द करण्यात यावे, याकरीता आमदार बाळासाहेब मांगुळकर यांची भेट घेणार असल्याचे ओम तिवारी यांनी सांगीतले.
0 Comments