रुग्ण कल्याण समिती व डीनची होणार बैठक

कै. वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयातील समस्येवर तोडगा काढण्यासाठी चर्चा होणार ! 

यवतमाळ: कै. वसंतराव नाईक जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर 23 डिसेंबरपासून संघपाल बारसे आणि प्रवीण आडे यांच्या नेतृत्वाखाली रुग्णसेवक समितीने रुग्णांच्या समस्या सोडवण्यासाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. आंदोलनाच्या पाचव्या दिवशी, 27 डिसेंबर रोजी संध्याकाळी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश जतकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. लेखी स्वरूपात काही मागण्या मान्य करण्यात आल्या. डाॅ. जतकर यांनी प्रलंबित मागण्या 2 जानेवारी 2025 रोजी रुग्णसेवक शिष्टमंडळासोबत होणाऱ्या बैठकीत सोडवण्याचे आश्वासन दिले. यानंतर संघपाल बारसे व प्रवीण आडे यांच्या संमतीने अन्नत्याग आंदोलनाची सांगता करण्यात आली. यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष वसंत ढोके, अॅड. जयसिंग चव्हाण, आपचे तालुकाध्यक्ष मोबीन शेख, रुग्णसेवक किशोर बाभुळकर, कॉम्रेड सचिन मनवर, अमर आडे, प्रा.पंढरी पाठे, मनीषा तिरणकर, विकास लसंते, शिवा माने यांची उपस्थिती होती.

 
“काही मागण्या मान्य केल्या असून उर्वरित मागण्यांची पूर्तता नववर्षात नक्की केली जाईल.जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अखत्यारित येणाऱ्या मागण्या पूर्ण करून रुग्णांना सर्वोच्च सेवा देण्याचा आमचा प्रयत्न असेल. यानंतर आंदोलकांना पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येऊ नये, याची आम्ही पूर्ण काळजी घेऊ.”
 डॉ. गिरीश जतकर (अधिष्ठाता,वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालय, यवतमाळ)

आंदोलनामुळे रुग्णसेवकांच्या मागण्या प्रशासनाच्या निदर्शनास आल्या आणि काही महत्त्वाच्या मागण्या त्वरित पूर्ण झाल्या.उर्वरित मागण्या लवकरच मार्गी लागतील,अशी अपेक्षा आहे.ग्रामीण आणि शहरी भागातील रुग्णांच्या सेवेत सुधारणा होण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

संघपाल बारसे (रुग्ण आंदोलक, यवतमाळ )

Post a Comment

0 Comments