नेर तालुक्यातील लोनाडी शिवारात पट्टेदार वाघांचा संचार
वनविभागाला आढळले ' पगमार्क '
यवतमाळ : जिल्ह्यातील नेर वनविभागाच्या लोनाडी बीट मधे पुन्हा एकदा वाघांचा मुक्तपणे संचार आहे. दोन वाघ व दोन बछडे गायीची शिकार करताना वनविभागाच्या ट्रॅप कॅमेरामध्ये कैद झाले आहे. तसेच दोन पट्टेदार वाघ व त्यांच्या बछड्यांचे ' पगमार्क' पायाचे ठसे आढळून आढळून आले.
यवतमाळ जिल्ह्यातील नेर वन विभागाच्या लोणाडी, सिंदखेड, मंगरूळ, चिखली कान्होबा,आसोला परिसात दरवर्षी वाघांचा संचार असतो.या परिसरात वाघांची हालचाल असल्याचे अनेकदा उघड झाले. ६ डिसेंबर रोजी लोणाडी परिसरात वाघांनी ६ जनावरांना फस्त केल्याच्या तक्रारी होत्या. या भागात नेमका वाघाचा संचार आहे की नाही, हे पिहण्यासाठी नेर वनविभागाने विशेष मोहीम हाती घेतली होती. लोनाडी बीटमधील कक्ष क्रमांक ४१७ व ४१८ मध्ये दोन वाघ आणि त्यांच्या दोन बछड्यांनी एका गायीची शिकार करतानाचे दृश्य ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाले. याशिवाय, या भागात चार वाघांचे पगमार्क (पायांचे ठसे)ही आढळले. त्यामुळे वाघांचा मुक्त संचार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे ६ डिसेंबर रोजी वनविभागाच्या लोणाडी वन क्षेत्रातील ट्रॅप कॅमेरामध्ये दोन वाघ आणि दोन बछडे गाईची शिकार करू खात असल्याचे कैद झाले. त्याच दिवशी लोनाडी येथील बळीराम साजू राठोड या शेतकऱ्याची गाय फस्त केल्याची तक्रार वनविभागाला प्राप्त झाली. पगमार्कवरून दोन वाघ आठ ते नऊ वर्षांचे आणि बछडे दोन ते तीन वर्षाचे असल्याचा प्राथमिक कयास वनयंत्रणेने वर्तवला असून वनविभागाने या घटनेनंतर परिसरात सतर्कतेचे आदेश दिले आहे. स्थानिकांना जंगलात प्रवेश टाळण्याचा सल्ला दिला आहे. वाघांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी यंत्रणा सक्रिय झाली असून या घटनांमुळे नेर वनविभागातील व्याघ्र अधिवासाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.
ट्रॅप कॅमेऱ्यात वाघांच्या हालचाली डिटेक्ट
नेर वनपरिक्षेत्रांतर्गत लोणाडी बीटमधे कक्ष क्रमांक ४१८ मधे लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात वाघांच्या हालचाली डिटेक्ट झाल्या आहे. सोबतच या ठिकाणी वाघांचे पगमार्क देखील आढळले आहे.त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी, शेतकऱ्यांनी रात्री उशिरा एकटे जंगल परिसरात फिरणे टाळावे.वाघांच्या हालचालींवर आम्ही नजर ठेवून आहो अअशी प्रतिक्रिया नेर येथिल वनपरिक्षेत्र अधिकरी सुभाष लंबे यांनी दिली.
0 Comments