सूर्यवंशीच्या मृत्यूस जबाबदार असलेल्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा

जिल्हाधिकारींना वकीलांचे निवेदन !

यवतमाळ  : परभणी येथील संविधान अवमान प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सोमनाथ सूर्यवंशीच्या कोठडीतील मृत्यूस जबाबदार असलेल्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा यासह विविध मागण्यांचे निवेदन आज वकिलांतर्फे जिल्हाधिकारी डाॅ. पंकज आशिया यांना देण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकारी मार्फत हे निवेदन देण्यात आले.



    परभणी शहरात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतीचा अवमान झाल्यानंतर आंबेडकरी जनतेने शांततेत बंद पाळून आपला निषेध नोंदविला. याप्रसंगी काही गैर आंबेडकरी असामाजिक तत्त्वांनी बंदचा गैरफायदा घेऊन हिंसक कृत्ये केली त्यामुळे पोलिसांकडून समस्त आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. असे निवेदनात नमूद करण्यात आले असून यावरच पोलीस थांबले नाहीत तर त्यांनी आंदोलन संपल्यावर आंबेडकरी वस्त्यावस्त्यांमधून कोम्बिंग ऑपरेशन चालवून दडपशाहीने अनेक निरपराध तरुण व वयस्कर व्यक्तींना मारहाण केली, घरांची दारे तोडली, ऑटोरिक्षा  फोडल्या. अनेक निरपराध लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच सोमनाथ सूर्यवंशी या कायद्याच्या विद्यार्थ्यांस जबर मारहाण केली त्यामुळे त्याचा कोठडीत मृत्यू झाला, असेही कथन करण्यात आले. यात संविधानाचा अवमान करणाऱ्या समाजकंटकांमागे कोण कोण आहेत याचा तपास करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, बंद दरम्यान हिंसक कृत्य करण्यासाठी कोणी कोणाला चिथावणी दिली त्या चिथावणीखोरांचा छडा लावून त्यावर कठोर कारवाई करावी, कोठडीत मृत्यू पावलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी तसेच असंवैधानिक पद्धतीने वस्त्यावस्त्यांमधून दडपशाहीने कोम्बिंग ऑपरेशन चालवून  घरांची दारे तोडून घरात असलेल्या अनेक निरपराध तरुण व वयस्कर व्यक्तींना मारहाण करणाऱ्या,  ऑटोरिक्षा  फोडणाऱ्या व अनेक निरपराध लोकांवर गुन्हे दाखल करणाऱ्या पोलिसांवर गुन्हे दाखल करण्यात यावे आणि मृतक सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक सहाय्य देण्यात यावी अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. शिष्टमंडळात ॲड. रविशेखर बदनोरे, ॲड. परमेश्वर अडकिणे, ॲड.राजेंद्र धात्रक, ॲड. रामदास राऊत, ॲड. धनंजय मानकर, ॲड. जयपाल पाटील, ॲड.अनिल बगाडे, ॲड. अमोल इंगोले, ॲड. सुमीत कांबळे, ॲड. सचिन आठवले, ॲड. रोशन गजभिये, ॲड. शाहरुख शेख, ॲड. सुमेध राऊत, ॲड. प्रशांत किर्दक, ॲड. गौतम खरतडे, ॲड. आनंद गायकवाड, ॲड. निखिल सायरे, ॲड. घनश्याम अत्रे, ॲड. विशाल मेश्राम, आशीष घायवान, हर्षदीप बांगर, भूषण ब्राह्मणे इत्यादी हजर होते.

Post a Comment

0 Comments