थकबाकी भरावीच लागणार : महावितरणच्या अभय योजनेची मुदत ३१ डिसेंबर पर्यंतच!

तर विलंब आकार आणि व्याजमाफीचा फायदा घ्या !

वीज थकबाकीदारांना अभय योजनेचा फायदा घेण्याचे आवाहन


यवतमाळ : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार कोणत्याही जागेचा मालक किंवा खरेदीदार किंवा ताबेदार / वापर कर्त यांनी वीजबिलाची थकबाकी भरणे बंधनकारक आहे. थकबाकी न भरल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते, तसेच ही थकबाकी ग्राहकाच्या इतर चालू वीज जोडणीवर वळती होऊ शकते. त्यामुळे थकबाकीदार ग्राहकांनी अभय योजनेत सहभागी होत विलंब आकार आणि व्याजमाफीचा फायदा घेऊन सवलतीत थकबाकी भरावी असे आवाहन महावितरणने केले आहे.

जिल्ह्यात अभय योजनेत सवलतीसाठी पात्र असलेल्या ग्राहकांना सहभागी करून घेण्यासाठी तसेच महावितरणची थकीत बिल वसुल करण्यासाठी मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात आणि अधीक्षक अभियंता प्रविण दरोली यांच्या पुढाकाराने सर्व अधिकारी कर्मचारी थकबाकीदार व कायमस्वरूपी खंडित वीज ग्राहकापर्यंत पोहचत आहे.

वीज जोडणी कायमस्वरूपी  खंडित झालेल्या थकीत वीज ग्राहकांसाठी महावितरणच्या अभय योजनेला डिसेंबर २४ अखेर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्ह्यात आज पर्यंत या योजने अंतर्गत एक कोटी ८७ लाखांची थकबाकी जमा झाली असून योजनेत सहभागी झालेल्या एक हजार ६८७ वीजग्राहकाना व्याज व विलंब आकारापोटी २ कोटी ७२ लाखाची माफी मिळाली आहे.योजनेत  पुनर्जोडणीची संधी असल्याने एक हजार ग्राहकांना पुनर्जोडणी देण्यात आली आहे.आता या योजनेत सहभागी होण्यासाठी केवळ सहा दिवसांचा अवधी शिल्लक राहीला आहे.योजनेत थकबाकी वरील व्याज,विलंब आकार माफ करून आणि सुलभ हप्त्यात थकबाकी भरण्याची सोय आहे.

३१ मार्च २०२४ पर्यंत थकीत बिलामुळे कायमस्वरुपी वीज पुरवठा खंडित झालेल्या (पीडी) घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांसाठी ही योजना आहे. योजनेत थकीत बिलाच्या मूळ रकमेवरील व्याज आणि विलंब आकाराच्या स्वरुपातील दंड माफ करण्यात येणार आहे. तसेच मूळ बिलाच्या ३० टक्के रक्कम भरून ऊर्वरित ७० टक्के रक्कम सहा हफ्त्यात भरायची सवलत ही या योजनेतील ग्राहकांना उपलब्ध आहे. जे घरगुती, व्यावसायिक इत्यादी लघुदाब ग्राहक एकरकमी थकित बिल भरतील त्यांना १० टक्के अतिरिक्त सवलत देण्यात येईल. उच्चदाब औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांना ५ टक्के अतिरिक्त सवलत मिळेल.वीजबिलाचा वाद न्यायप्रविष्ट असलेल्या पीडी ग्राहकांनाही या योजनेचा काही अटी व शर्तीवर लाभ घेता येणार आहे.३१ डिसेंबर २४ पर्यंतच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. जिल्‍हयातील ७८ कोटी ७८ लाखासह एकुण ९९ हजार २४१ थकबाकीदार ग्राहक या योजनेत लाभ घेण्यासाठी पात्र आहे. परंतु, अद्यापपर्यंत फक्त १ हजार ६८७ ग्राहकांनीच लाभ घेतला असून योजना कालावधी संपल्यानंतर उर्वरित थकबाकीदार ग्राहकांना मुळ थकबाकी व्याज आणि विलंब आकारासह भरावी लागणार आहे.

संबंधित वीज ग्राहकांना www.mahadiscom.in/wss/wss या वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने अभय योजनेचा लाभ घेता येईल. महावितरणच्या मोबाईल ॲपवरून योजनेचा लाभ घेता येईल. वीज ग्राहक १९१२ किंवा १८००२३३३४३५ किंवा १८००२१२३४३५ या टोल फ्री क्रमांकावर फोन करूनही माहिती घेऊ शकतात. योजनेनुसार पैसे भरल्यानंतर संबंधित वीज ग्राहकाला पुन्हा एकदा नियमित वीज कनेक्शन घेता येईल. त्याच पत्त्यावर योग्य पुरावे सादर करून नव्या नावाने वीज कनेक्शन घेण्याचीही सोय उपलब्ध आहे.

Post a Comment

0 Comments