यवतमाळ : वणी तालुक्यातील उकणी कोळसा खाणीत मृतावस्थेत
वाघ आढळला होता. या वाघाचे नख व दात चोरून नेल्याचे तपासात उघड झाले होते. अमरावती
येथील वनविभागाच्या अधिका-यांनी आज कोळसा खाणीतील चार आरोपींना अटक केली होती. त्या
आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता वनकोठडी सुनावली होती. दरम्यान कोठडीत
असतांना आरोपीने गळफास घेण्याचा प्रयत्न केला.
नागेश विठ्ठल हिरादेवे वय ४० रा. उकणी असे गळफास घेण्याचा प्रयत्न करणा-या आरोपीचे नाव आहे. ते निलजई कोळसा खाणीत कर्तव्यावर होते. ७ जानेवारी रोजी उकणी कोळसा
खाणीत मृतावस्थेत वाघ आढळला होता. त्यावेळी वाघाचे नख व दात नसल्याने, वाघाची
शिकार तर झाली नाही ना असा संशय व्यक्त करीत वनविभागाने तपास सुरु केला होता. कोळसा
खाणीतील कर्मचा-यांनी नख व दात चोरून नेल्याचे तपासात समोर आले होते. त्यानंतर वेकोलीच्या
चार कर्मचा-यांना अटक केली होती. चारही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, कोठडीत
ठेवण्याचे आदेश दिले होते. दरम्यान नागेश हिरादेवे याने गळफास लावण्याचा प्रयत्न
केला. ही बाब वनविभागाच्या कर्मचा-यांच्या लक्षात आली. त्यामुळे वनविभागाच्या
कर्मचा-यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. यावेळी सदर आरोपीला खाजगी
रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेने वनविभागासह कोळसा खाणीत खळबळ उडाली
आहे.
0 Comments