भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान असून त्याची रचना, तत्त्वे आणि मूल्ये यामुळे ते एक अद्वितीय दस्तऐवज मानले जाते. भारताला प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्याचा ऐतिहासिक क्षण २६ जानेवारी १९५० रोजी आला, जेव्हा संविधानाने औपचारिकरित्या अमलात येऊन भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा होऊ लागला. या घटनेचा उद्देश म्हणजे भारतातील नागरिकांना त्यांच्या हक्कांचे संरक्षण देणे, सामाजिक न्यायाची स्थिरता राखणे आणि देशातील विविधतेत एकतेची भावना जागवणे होय.
भारतीय संविधानाची प्रस्तावना आपल्याला स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय यांचे महत्त्व स्पष्टपणे दर्शवते. हाच संविधानाचा आत्मा असल्याचे आपण मानू शकतो. या तत्त्वांच्या आधारेच देशाची प्रगती होत आहे. प्रजासत्ताक दिन हा केवळ एक उत्सव नसून आपल्या मूलभूत हक्कांच्या आणि कर्तव्यांच्या महत्त्वाची जाणीव करून देणारा दिवस आहे. संविधानाच्या रचनेमागे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. राजेंद्र प्रसाद आणि इतर संविधान निर्मात्यांची दूरदृष्टी होती. त्यांच्या कष्टांमुळे आज भारतीय नागरिकांना त्यांच्या हक्कांचे भान आहे आणि ते योग्य पद्धतीने रक्षण केले जात आहेत.
मूलभूत हक्कांची कल्पना भारतीय संविधानाच्या तिसऱ्या भागात आहे. या हक्कांचा उद्देश नागरिकांच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा, समानतेचा आणि सन्मानाचा आदर करणे हा आहे. भारतीय संविधानाने आपल्याला सहा प्रमुख मूलभूत हक्क दिले आहेत: समानतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क, आणि घटनात्मक उपायांचा हक्क. हे हक्क फक्त कागदावरच नसून संविधानाने त्यांना अंमलबजावणीसाठी योग्य तो संरक्षण दिला आहे. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळावा आणि कोणत्याही प्रकारचे भेदभाव होऊ नये, यासाठी संविधानाने समानतेचा हक्क दिला आहे. कलम १४ नुसार, कायद्यापुढे सर्व समान आहेत. यामुळे जाती, धर्म, वंश, लिंग, जन्मस्थान इत्यादी आधारांवर होणारा भेदभाव बेकायदेशीर ठरतो. कलम १५ आणि १६ समाजातील मागासवर्गीय घटकांना आरक्षणाची व्यवस्था देऊन त्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न करतात. स्वातंत्र्याचा हक्क हा भारतीय नागरिकांच्या व्यक्तिमत्वाला स्वाभिमान प्रदान करणारा आहे. कलम १९ ते २२ मध्ये या हक्कांचे स्पष्टीकरण दिले गेले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, वावरण्याचा आणि स्थायिक होण्याचा अधिकार, व्यवसाय निवडण्याचा अधिकार यासारख्या स्वातंत्र्यांमुळे भारतातील लोकशाही मजबूत बनली आहे. परंतु, याच हक्कांच्या मर्यादा ठरवून त्याचा दुरुपयोग होणार नाही, याची दक्षता संविधानाने घेतली आहे.
शोषणाविरुद्धचा हक्क हा समाजातील दुर्बल घटकांना संरक्षण देण्यासाठी महत्त्वाचा ठरतो. बालमजुरी, मानवतस्करी, आणि अन्यायकारक जबरदस्ती यासारख्या शोषणाच्या प्रकारांवर संविधानाने कठोर निर्बंध आणले आहेत. हा हक्क भारतीय समाजाला नैतिकदृष्ट्या उंचावतो आणि देशाला प्रगतिशील बनवतो. भारतीय समाज हा धार्मिक, सांस्कृतिक, आणि भाषिकदृष्ट्या विविधतेने नटलेला आहे. या विविधतेचा आदर राखण्यासाठी संविधानाने धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क दिला आहे. कलम २५ ते २८ यामध्ये प्रत्येक व्यक्तीला आपले धर्मस्वातंत्र्य जपण्याचा अधिकार दिला आहे. यामुळे धर्मनिरपेक्षता ही भारताच्या लोकशाहीची प्रमुख ओळख बनली आहे. सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क हे अल्पसंख्याकांच्या हितासाठी असून त्यांच्या भाषिक आणि सांस्कृतिक ओळखीचे संरक्षण करतात. कलम २९ आणि ३० यामध्ये या हक्कांचे स्वरूप स्पष्टपणे नमूद केले आहे. विविध संस्कृती आणि परंपरा यांचे जतन करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे यामुळे भारताचे बहुसांस्कृतिक स्वरूप अधिक बळकट झाले आहे.
घटनात्मक उपायांचा हक्क हा संविधानाने दिलेला अत्यंत महत्त्वाचा अधिकार आहे. हा हक्क नागरिकांना न्यायालयाच्या माध्यमातून त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्याचा मार्ग दाखवतो. जर एखाद्या व्यक्तीचा मूलभूत हक्क बाधित झाला, तर तो सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयात याचिका दाखल करून न्याय मागू शकतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या हक्काला “संविधानाचा हृदय आणि आत्मा” असे संबोधले आहे. भारतीय संविधानाच्या मूळ स्वरूपाचे संरक्षण करणे आणि त्याचे योग्य अर्थाने पालन होणे हे संविधानाच्या भक्कम अंमलबजावणीवर अवलंबून आहे. परंतु, संविधानाचे तात्पर्य आणि त्याचा अर्थ समजून घेण्यासाठी न्यायालयीन निर्णयांची भूमिकाही महत्त्वाची ठरते. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांनी दिलेल्या निर्णयांमुळे भारतीय संविधानाच्या विविध कलमांची व्यापक व्याख्या घडली आहे. मूलभूत हक्कांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेले निर्णय संविधानाच्या तात्त्विक स्वरूपाला अधिक गती देतात. उदाहरणार्थ, केशवानंद भारती प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने संविधानाच्या मूलभूत संरचनेचा सिद्धांत प्रस्थापित केला. या निर्णयामुळे संविधानाचे महत्त्व आणि त्याचे रक्षण करण्याची गरज अधोरेखित झाली. त्याचप्रमाणे मनिका गांधी विरुद्ध भारत सरकार प्रकरणात व्यक्तिस्वातंत्र्याच्या व्याख्येत व्यापकता आणली गेली.
संविधानाच्या तात्पर्याची व्याख्या करताना न्यायालयाने वेळोवेळी मूलभूत हक्कांच्या आणि राज्याच्या धोरणात्मक तत्त्वांच्या समन्वयावर भर दिला आहे. राज्याने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयांचा मूळ हेतू सामाजिक न्याय साधणे हा असला पाहिजे. यामुळे संविधानाचे उद्दिष्ट आणि मूल्ये जनतेपर्यंत पोहोचतात. भारतीय प्रजासत्ताक दिन हा केवळ तिरंगा फडकवण्याचा किंवा उत्सव साजरा करण्याचा दिवस नाही. तो संविधानाचे महत्त्व अधोरेखित करणारा दिवस आहे. संविधानाने दिलेल्या हक्कांचा वापर करताना प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखणे आवश्यक आहे. मूलभूत हक्कांसोबत संविधानाने मूलभूत कर्तव्यांची संकल्पना दिली आहे. आपल्या देशाच्या प्रगतीसाठी, सामाजिक न्यायासाठी, आणि राष्ट्राच्या एकात्मतेसाठी या कर्तव्यांचे पालन करणे गरजेचे आहे. भारतीय संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक नाही तर भारतीय समाजाच्या मूल्यांचे, तत्त्वांचे आणि स्वप्नांचे प्रतीक आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपण संविधानाच्या या मूल्यांचा पुनरुच्चार केला पाहिजे. प्रजासत्ताक दिन आपल्याला संविधानाच्या संरक्षक तत्त्वांची आठवण करून देतो आणि आपण ज्या लोकशाही प्रक्रियांचा भाग आहोत, त्याबद्दल अभिमान वाटतो. यामुळे आपण आपल्या हक्कांचे रक्षण करण्यास सक्षम होतो आणि देशाच्या प्रगतीसाठी योगदान देऊ शकतो. भारतीय संविधान आणि प्रजासत्ताक दिन यांचा हा अतूट संबंध आपल्याला देशाच्या सार्वभौमत्वाचा आणि स्वातंत्र्याचा अभिमान जागवतो.भारतीय संविधानाची प्रेरणा आणि त्याच्या मूल्यांची जाणीव ठेवून, आपण समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्याचा आणि देशातील एकात्मता मजबूत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रजासत्ताक दिन हा फक्त एका दिवसापुरता मर्यादित नसून, तो संविधानाच्या महत्त्वाचे स्मरण करून देणारा आणि त्याच्या मूलभूत तत्त्वांचे पालन करण्यास प्रेरणा देणारा प्रसंग आहे.
ॲड. लोकेश मालखेडे
मोबाईल ९२८४२२४९८१
(लेखक जिल्हा व सत्र न्यायालय, यवतमाळ येथे प्रॅक्टिस करतात.)
0 Comments