नंददीप फाउंडेशन पहिल्या पुरस्काराचे मानकरी, प्र. मा. रुईकर ट्रस्टच्या वतीने 'रुईकर ट्रस्ट सेवा पुरस्कार

प. पू. सद्गुरुदास महाराज यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील शतकी वाटचाल केलेल्या जुन्याजाणत्या व विविध संस्थांना मदत करीत आलेल्या प्रल्हाद माधोबा रुईकर ट्रस्टच्या वतीने 2025 या वर्षापासून 'रुईकर ट्रस्ट सेवा पुरस्कार' दिला जाणार आहे. यवतमाळ व परिसरातील उत्कृष्ट सामाजिक कार्य करीत आलेल्या व्यक्ती अथवा संस्थेस हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केला जाईल. 51 हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. बेघर मनोरुग्णांच्या जीवनात आशेचा दीप चेतविणाऱ्या 'नंददीप फाउंडेशन'ला पहिला पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 
यंदाच्या या पुरस्कारासाठी निवड समिती स्थापन करण्यात आली होती. यामध्ये यवतमाळतील सुप्रसिद्ध समाजसेवी दंतचिकित्सक डॉ. सुरेंद्र पद्मावार, सेवा समर्पण ट्रस्टचे सचिव अनंत कौलगीकर, सौ. रश्मी नावलेकर, जयंत कर्णिक व विवेक कवठेकर यांचा या समितीत समावेश होता. अर्ज न मागवता परंतु विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या चर्चेतून आलेल्या व्यक्ती व संस्थांचा विचार करून निवड समितीने बेघर मनोरुग्णांच्या जीवनात आशेचा दीप चेतविणाऱ्या 'नंददीप फाउंडेशन' चे नाव ट्रस्टला सुचविले. या नावावर संस्थेने शिक्कामोर्तब करून नंददीप फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप शिंदे यांना तो समारंभपूर्वक प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे.

रुईकर ट्रस्ट सेवा पुरस्कार नागपूर येथील सुप्रसिद्ध शिवकथाकार विजयराव देशमुख उपाख्य प. पू. सद्गुरुदास महाराज यांच्या शुभहस्ते, प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री तथा शिवाजी महाविद्यालय, अमरावती येथील प्राचार्य डॉ. स्मिता देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत व ट्रस्टचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. उदय नावलेकर यांच्या अध्यक्षतेत प्रदान करण्यात येईल.

हा पुरस्कार वितरण समारंभ मंगळवार, दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी प्र. मा. रुईकर ट्रस्ट माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, नांझा, ता. कळंब जि. यवतमाळ येथे संपन्न होणार आहे असून या सोहळ्यास यवतमाळ व परिसरातील नागरिक बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त प्रमोद देशपांडे व विश्वस्त कृ. र. उपाख्य दादा गोखले यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments