यवतमाळ : पत्रकारितेचे क्षेत्र कायम धावपळीचे राहिले आहे. प्रत्येक ऋतूतच प्रिंटमीडियासह इलेक्ट्रानिक माध्यमातील पत्रकारांना कष्ट घ्यावे लागतात. बातमीसाठी पत्रकारांचा रोजचा संघर्ष त्यांच्या जीवनात ताणतणावालाही आमंत्रण देतो. त्यातूनच दरवर्षी महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघ संलग्नित जिल्हा श्रमिक पत्रकारसंघाकडून कौटुंबिक स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन केले जाते. शनिवारी 11 जानेवारी रोजी सायंकाळी हा स्नेहमिलनाचा सोहळा हॉटेल व्हेनिशिअनमध्ये होत आहे. यावेळी विविध खेळ व स्पर्धांच्या माध्यमातून पत्रकार कुटुंबियांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचा प्रयत्न होणार आहे.
श्रमिक पत्रकारसंघाने नेहमीप्रमाणे यंदाही पत्रकार कुटुंबियांसाठी शनिवारी सायंकाळी कौटुंबिक स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन केले आहे. प्रिंट व इलेक्ट्रानिक माध्यमातील सर्व श्रमिक पत्रकारांसह वृत्तपत्र कार्यालयात काम करणाऱ्या प्रत्येकासाठी हा कार्यक्रम एक पर्वणी ठरतो. वर्षभर पत्रकार बातम्यांसाठी धावत असतो. समाजातील प्रत्येक घडणाऱ्या चांगल्या-वाईट घटना लोकांपुढे मांडत असतो. ज्यांच्यावर अन्याय झाला, त्याला न्याय मिळावा म्हणून, प्रशासनाचे डोळे उघडत असतो. मात्र यामध्ये पत्रकारांना स्वत:च्या आरोग्यासह कुटुंबियांकडेही लक्ष द्यायला वेळ नसतो. त्यामुळे एकमेकांच्या कुटुंबियांमध्येही ओळखी होत नाही. स्नेहमिलनाच्या कार्यक्रमातून सर्व पत्रकारांचे कुटुंबिय एकत्रित येतात. महिलांसह त्यांची मुले, मुली या कार्यक्रमात विविध खेळ व स्पर्धांच्या माध्यमातून आनंदात हरवून जातात. त्याच पद्धतीने आज शनिवारचाही स्नेहमिलन सोहळा होत आहे. या कार्यक्रमासाठी राज्याचे जलसंधारण मंत्री संजय राठोड, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे सीईओ मंदार पत्की, जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्यासह प्रशासनातील अनेक अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात प्रसिद्ध अँकरकडून विविध प्रकारच्या स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. पत्रकार कुटुंबातील मुला-मुलींच्या कलागुणांना वाव देण्याचा हा प्रयत्न होणार आहे. त्यांना आकर्षक बक्षिसेही दिली जाणार आहेत. या कार्यक्रमाला श्रमिक पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकारी,सदस्य बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा श्रमिक पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत राऊत, सचिव अमोल ढोणे व कार्यकारिणीने केले आहे.
0 Comments