धम्म कवि संमेलनात ‘करूणा आणि परिवर्तना’चा उद्घोष
बहारदार कविसंमेलनात एकापेक्षा एक सरस कवितांनी गझलांनी रसिक प्रेक्षकात
चैतन्य निर्माण केले. धम्म कविसंमेलनाचे अध्यक्ष गजानन वाघमारे यांनी गावकुसाबाहेरील
गरिबांच्या डोळ्यात साकाळलेल्या अश्रूंचे संवेदन
व्यक्त केले. अंधाराच्या दिशांना पार करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर या प्रज्ञासूर्याच्या
विचारांची आवश्यकता ठामपणे व्यक्त केले.
लाख सूर्याच्या प्रकाशाहून प्रखर झालास तू
हजारो काळजाचा बा गजर झालास तू
‘बाबासाहेब म्हणजे अंधूक डोळ्याची नजर' अशा प्रतिमा
विश्वातून त्यांनी बाबासाहेबांना अभिव्यक्त केले.
आबिद शेख यांनी ' जाती अहंकारामुळेच देश
मातीत जात आहे ' ही सल व्यक्त करून शेतकऱ्यांची विदारकता तरन्नुममध्ये काळीजस्वरातून
सादर केली. उपाशी पिलांच्या भूकेची काळजी असलेल्या शेतकर्याने हरवलेले स्वप्न पूर्ण
न होण्याच्या पराभूत भावनेने जीवनयात्रा संपवू नये असे आवाहन या कवीने केले.
‘उघडा पडेल सारा
संसार हा अशाने
मिटणार प्रश्न नाही गळफास घेतल्याने’
विनोद बुरबुरे यांनी वर्तमानातील काळवैरी घातपातांना अधोरेखित केले.काजव्यांप्रमाणे
टिमटिमणारे पुढारी होउन समाजाला दिशाहिन करू नका.त्यापेक्षा हातात तळपणाऱ्या विजा अन्
वाणीत बुद्धाची करूणा रुजायला हवी या संदर्भाने ते म्हणाले
‘केवढी झाली जरा
बघ चळवळीची झीज मित्रा
लाव या मातीत आता पिंपळाचे बीज मित्रा’
गजानन दराडे यांनी वास्तवाचे विविध पदर आविष्कृत केले. दिल्ली सरकारने
किमान दोन वेळच्या भाकरीचे नियोजन करावे ही मागणीच एका शेरातून त्यांनी केली, तर जगाला युद्धाची
नव्हे तर बुद्धाची गरज आहे, या अशयाचा शेर त्यांनी
सांगितला.
मज नको ही युध्दगाथा, रक्तरंजित वेद
ही ;
शील शांती कोरलेले पिंपळाचे
पान दे
सहभागी कवीतील प्रमोद कांबळे यांनी ' ज्ञानदर्शी बाबासाहेबांचे
व्यक्तिमत्व गझलेतून साकार केले. बुद्धामुळेच प्रज्ञेचे अवकाश मिळेल हा विश्वास अनिल
कोशे यांनी व्यक्त केला. कुणाकुणाला माणूस कळला हा प्रश्न गुलाब सोनोने यांनी विचारला.
शिक्षण क्षेत्रातील व्यस्तता प्रवीण चांदोरे यांनी व्यक्त केली. वर्तमान स्थितीत लोकशाहीला
वाचविण्याचे आवाहन गिरीष खोब्रागडे यांनी एका शेरामधून केले. भिडेवाडयाचे ऐतिहासिक
मूल्य कांताबाई सोनोने यांनी मांडले.
'जखमा' गझलेतून भीमऊर्जेमुळेच लढण्याची जिद्द निर्माण झाली असे प्रा. हर्षवर्धन तायडे म्हणाले. तसेच संतोष ढेंगे, राजेंद्र फुन्ने, विठ्ठल खोडे यांनी आपल्या कविता सादर केल्या. प्रवीण चांदोरे आणि प्रा. हर्षवर्धन तायडे यांनी काव्यविश्लेषण करीत संचालन केले. कवि संमेलनाची भूमिका डॉ. शांतरक्षित गावंडे यांनी मांडली. सलग दिड तास चाललेल्या या कविता आणि गझलांतील शब्दांनी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला.
0 Comments