केंद्रीय मंत्री गडकरी यांनी पाठवले रेल्वे राज्यमंत्र्यांना पत्र

 शकुंतला रेल्वे : यवतमाळ-मूर्तिजापूर-अचलपूर ब्रॉडगेजला स्पेशल प्रोजेक्ट स्टेटस द्या


यवतमाळ : यवतमाळ-मुर्तिजापूर धावणारी शकुंतला रेल्वे अनेक वर्षापासून बंद पडली आहे. शकुंतला रेल्वे सुरु व्हावी म्हणून शकुंतला रेल्वे विकास समिती पाठपुरावा करीत आहे. यवतमाळ-मूर्तिजापूर-अचलपूर रेल्वेमार्गाच्या मालकीहक्काशी संबंधित अडचणींबाबत शकुंतला रेल्वे विकास समितीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र पाठवले होते. या पत्राची दखल घेत गडकरींनी रेल्वे राज्यमंत्री व्ही सोमन्ना यांना पत्र पाठविले. यवतमाळ-मूर्तिजापूर-अचलपूर गेज परिवर्तनाला स्पेशल रेल्वे प्रोजेक्ट स्टेटस देण्याची मागणी केली आहे.

शकुंतला रेल्वे विकास समिती शकुंतला रेल्वेमार्गाशी संबंधित तांत्रिक अडचणींचा पाठपुरावा सातत्याने करत आली आहे. शकुंतला रेल्वेमार्ग खासगी कंपनीच्या मालकीचे असल्यामुळे हे रेल्वेमार्ग रेल्वे मंत्रालयाने हस्तांतरित करून घेऊन ब्रॉडगेज करणे आवश्यक आहे. गडकरींनी रेल्वे राज्यमंत्री सोमन्नांना लिहिलेल्या पत्रात मालकीहक्काशी संबंधित अडचण अधोरेखित करत २०१७ मध्ये राज्य शासन आणि रेल्वे मंत्रालयाने ठरवलेल्या कॅपिटल इन्व्हेस्टमेंट प्रोग्रामचा आणि कॉस्ट शेरिंगचा उल्लेख केला आहे. शकुंतला रेल्वेमार्गाच्या समस्येबाबत यवतमाळ येथील शकुंतला रेल्वे विकास समिती आणि अचलपूर येथील रेल बचाव सत्याग्रही  गडकरींकडे वारंवार संपर्क करत असल्यामुळे याबाबत आतापर्यंत ३ वेळा रेल्वे मंत्र्यांना गडकरींनी पत्र पाठवले आहे. पश्चिम विदर्भाच्या विकासाचा केंद्रबिंदू शकुंतला ब्रॉडगेज आहे. वर्धा-नांदेड प्रकल्पाला जोडणारा यवतमाळ-मूर्तिजापूर ब्रॉडगेज असल्याने या प्रकल्पाला अनन्यसाधारण महत्व आले आहे. मालकी हक्काशी संबंधित अडचण लवकरात लवकर सोडवून काही ठिकाणी भूसंपादन करणे आवश्यक आहे. त्यात वेळ जाऊ नये म्हणून सुरुवातीलाच या प्रकल्पाला विशेष प्रकल्प दर्जा देण्यात यावा, अशी शकुंतला रेल्वे विकास समितीने मागणी केली आहे.

 

 

Post a Comment

0 Comments