सहा तासात पार केले 75 किमी अंतर : देव चौधरी ‘टाटा अल्ट्रा मॅरथॉन’मध्ये दुसरा

यवतमाळ – पुसद तालुक्यातील देव पंचफुला श्रीरंग चौधरी या आंतरराष्ट्रीय धावपटूने आठवडाभरात धावण्याचे दोन विक्रम केले आहे. शनिवारी रात्री लोणावळा येथील जंगलातील मार्गाने पार पडलेल्या ‘टाटा अल्ट्रा मॅरेथान’मध्ये त्याने ७५ किमी अंतर अवघ्या सहा तास २० मिनिटांत पार करत द्वितीय क्रमांक पटकाविला. गेल्याच आठवड्यात १८ फेब्रुवारी रोजी देव याने यवतमाळ येथे सलग १३ तास धावून ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये १३० किमी धावण्याचा विक्रम नोंदविला होता. 

लोणावळा (पुणे) येथे शनिवारच्या मध्यरात्री पार पडलेल्या ‘टाटा अल्ट्रा मॅरथॉन’ तीन हजार ९०० धावपटू सहभागी झाले होते. ३५ किमी, ५० किमी आणि ७५ किमी अशा तीन टप्प्यात ही मॅरेथॉन झाली. अत्यंत खडतर असलेल्या ७५ किमीच्या टप्प्यात भारतातील केवळ २५ धावपटू सहभागी झाले होते. या मॅरेथॉनमध्ये एक हजार ३५० मीटर एलिवेशन होते. रात्री १२.३० वाजता ही स्पर्धा सुरू झाली. आज रविवारी सकाळी सहा वाजून ५० मिनिटांनी देव चौधरी याने ७५ किमी अंतर पार केले. या मॅरेथॉनमध्ये त्याला द्वितीय क्रमांकाचे ७५ हजार रूपयांचे पारितोषिक मिळाले. तीन दिवसांपूर्वीच सलग १३ तास १३० किमी धावल्यानंतर देव चौधरी याने पुन्हा ७५ किमी सलग धावून टाटा अल्ट्रा मॅरेथानमध्ये द्वितीय क्रमांक पटकाविल्याने अनेक क्रीडा प्रशिक्षकही आश्चर्य व्यक्त करत आहेत. मॅरेथॉनमध्ये ७५ किमी अंतर धावण्यासाठी अवघ्या ७२ तासांत शारीरिक आणि मानसिक क्षमता निर्माण होत नाही. मात्र देव चौधरी याने निश्चय आणि आत्मविश्वासाच्या बळावर ही किमया करून दाखविली, अशी प्रतिक्रिया यवतमाळकर क्रीडा प्रेमींनी व्यक्त केली आहे.

अन् देव बनला 'फास्टेस्ट इंडियन' 

देव चौधरी याने दक्षिण आफ्रिकेच्या डर्बन सिटीत 'द अल्टिमेट ह्यूमन रेस' ही कॉम्रेड मॅरेथॉन जिंकून तो 'फास्टेस्ट इंडियन' बनला. या मॅरेथॉनमध्ये देवने ८६ किलोमीटर अंतर सात तास चार मिनिटात पार केले होते. २०२२ मध्ये बंगलोर येथे झालेल्या हेन्नूर बांबू अल्ट्रा या १६१ किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेत तो सतत १८ तास २४ मिनिटे धावला. जयपूर येथे ‘ब्लॅक हॉर्स बॅक यार्ड अल्ट्रा’ मॅरेथोनमध्ये २२ तास, पुणे येथे ‘स्वराज्य बॅक यार्ड अल्ट्रा’ मॅरेथॉनमध्ये तो १२ तास धावला. ‘इंडियन बॅक यार्ड अल्ट्रा मॅरेथॉन’मध्ये तो सलग ३६ तास धावला. पुणे येथे झालेल्या ‘जम्पिंग गोरिला माऊंटन ट्रेल’ या मॅरेथॉनमध्ये सिंहगड परिसरात तो तब्बल १२० किलोमीटर सलग धावला व प्रथम विजेता ठरला. ‘कास अल्ट्रा’ ही ६५ किलोमीटरची मॅरेथॉन पाच तास ३८ मिनिटांत पूर्ण केली. देव याच्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

Post a Comment

0 Comments