कृषी ग्राहकांच्या प्रश्नांना प्राधान्य द्यावे : शर्मा
यवतमाळ :- भारतात कृषी व्यवसाय महत्त्वाचा असल्यानेच भारताची अर्थव्यवस्था आंतरराष्ट्रीय प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा टिकून राहिली आहे. मात्र समाज जोपर्यंत शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहत नाही तोपर्यंत कृषक समाज खऱ्या अर्थाने सुखी होऊ शकणार नाही. ग्राहक पंचायत सारख्या संघटनांनी कृषी ग्राहकांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन शेतकऱ्यांना सर्व स्तरावर सहकार्य करावे असे आवाहन यवतमाळ चे प्रयोगशील शेतकरी आणि भारत सरकारने पद्मश्री देऊन गौरविलेले सुभाष शर्मा यांनी केले.
शर्मा यांना पद्मश्री मिळाल्याबद्दल अ.भा. ग्राहक पंचायत तर्फे त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. प्रारंभी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे विदर्भ प्रांत अध्यक्ष डॉ. नारायण मेहेरे, जिल्हा संघटक हितेश सेठ, अनंत भिसे, प्रांत प्रसिद्ध प्रमुख वीरेंद्र चौबे, शहर सचिव शेखर बंड, विपुल पोबारू , संतोष डोमाळे यांनी श्री शर्मा यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी राधामल जाधवानी, जिनेन्द्र बंगाले , मोहन कुलकर्णी , प्रकाश चनेवार , इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना श्री शर्मा यांनी ग्राहक पंचायत च्या कार्यकर्त्यांनी पर्यावरण रक्षणासाठी जल संवर्धनासाठी आपल्या कार्यक्रमातून मोठ्या स्तरावर प्रयत्न करण्याची ही आवाहन केले.
0 Comments