कुंभ मेळाव्या सारखा बंजारा महोत्सव करणार : ना. संजय राठोड

 दरवर्षी होणार पाच दिवसीय बंजारा महोत्सव : संत सेवालाल महाराज जयंती महोत्सव

यवतमाळ : संत श्री सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुढील वर्षापासून पोहरादेवी येथे पाच दिवसीय बंजारा महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. या महोत्सवात बंजारा संस्कृती, समाजजीवन आणि खाद्य संस्कृतीचे दर्शन होईल. येणारा बंजारा महोत्सव नियोजनाच्या दृष्टीने कुंभ मेळाव्यासारखा आयोजित करण्यात येईल असे प्रतिपादन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले. बंजारा समाजाचे श्रद्धास्थान संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त पोहरादेवी येथे आज शनिवारी आयोजित जयंती महोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते.

या कार्यक्रमात छत्रपती संभाजी नगर येथील सुप्रसिद्ध गायक नरेंद्र राठोड व संच यांनी बंजारा भजन आणि भक्तिगीत सादर केले. यावेळी संत सेवालाल या चित्रपटाचे दिग्दर्शक, अभिनेता सी. के. पवार यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महंत जितेंद्र महाराज यांनी केले. संचालन प्रा. राजेश चव्हाण यांनी केले. यावेळी देशभरातील बंजारा समाज बांधव जयंती उत्सवात सहभागी झाले होते.

कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर

अध्यक्षस्थानी बंजारा समाजाचे धर्मगुरू, महंत आ. बाबुसिंग महाराज होते. यावेळी महंत कबीरदास महाराज, जितेंद्र महाराज, यशवंत महाराज, सुनील महाराज, रायसिंग महाराज, शेखर महाराज, गोपाल महाराज यांच्यासह राज्यमंत्री ना. इंद्रनील नाईक, आमदार सईताई डहाके, आमदार राजेश राठोड, माजी खासदार हरिभाऊ राठोड, ज्येष्ठ मार्गदर्शक हरिचंदजी राठोड, जीवन पाटील, पोहरादेवीचे सरपंच विनोद राठोड, वसंतनगरचे सरपंच गणेश राठोड प्रामुख्याने उपस्थित होते.

बंजारा समाजातील ‘हि-या’चा गौरव

बंजारा समाजात अनेक हिरे प्रसिद्धीपासून दूर राहून समाजासाठी अविरत काम करत आहेत. बंजारा समाजाचे नाव या लोकांनी जगात केले आहे. त्यांच्या कामाचा गौरव व्हावा म्हणून पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त 'सेवा' पुरस्कार सुरू करण्यात आला. पुरस्काराची ही परंपरा कायम राहावी म्हणून भविष्यात सर्वच क्षेत्रात काम करणाऱ्या समाजातील अशा हिऱ्यांचा शोध घेऊन बंजारा महोत्सवात अधिक मोठ्या स्वरूपात हा पुरस्कार दिला जाईल, असेही ना. संजय राठोड यांनी सांगितले. 

बंजारा समाजाने संघटीत राहावे

संत सेवालाल महाराज यांच्या विचारांवर मार्गक्रमण करत बंजारा समाज हा संकटात असणाऱ्यांच्या कायम पाठीशी राहतो. या सोशिक आणि हिंमतवान समाजाच्या विकासासाठी, समाजाचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी बंजारा समाजाचे सर्व नेते राजकीय, सामाजिक पातळीवर कायम प्रयत्न करत आहेत. बंजारा समाजानेही समाजासाठी लढणाऱ्या व्यक्तींच्या कायम पाठीशी राहावे. एकत्र रहावे, संघटित राहावे, असे ना. संजय राठोड म्हणाले.

प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य करणार : महंत आ. बाबुसिंग महाराज

अध्यक्षीय भाषणात धर्मगुरू, महंत आमदार बाबुसिंग महाराज यांनी, देशातील १० कोटी बंजारा समाजाने आपले प्रश्न सोडविण्यासाठी कायम एकत्र राहिले पाहिजे. आपण मंत्री संजय राठोड व समाजातील सर्व लोकप्रतिनिधींचे कायम सहकार्य राहणार आहे असे, असे सांगितले.

एकजुट ठेवावी : ना. इंद्रनिल नाईक

यावेळी बोलताना राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी, सर्व समाजाने कायम एकजूट ठेवावी, असे आवाहन केले. पोहरादेवी विकासात मंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेला मूर्त रूप देणाऱ्या सर्व, अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कौतुक ना. नाईक यांनी यावेळी केले.

ना. राठोड यांच्या प्रयत्नातून विकासकामे

आमदार राजेश राठोड यांनी बंजारा समाजाचे नेते, राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या विशेष प्रयत्नांतून व पुढाकाराने पोहरादेवी येथे कोट्यवधीची विकासकामे सुरू आहेत, असे सांगितले.

संत सेवालाल महाराज यांच्या समाधीचे दर्शन

पोहरादेवीस आंतरराष्ट्रीय पर्यटनाच्या नकाशावर आणणाऱ्या बंजारा विरासतनंगारा भवन या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. मंत्री संजय राठोड यांनी पोहरादेवी येथे पोहचताच सर्वप्रथम संत सेवालाल महाराज यांच्या समाधी मंदिरात दर्शन घेतले. येथे पाळण्याचे दर्शन घेऊन संत सेवालाल महाराज जन्मोत्सव साजरा करण्यात आला. तसेच अरदास व भोग चढविला. यावेळी ना. संजय राठोड यांनी धर्मगुरू, संत रामराव बापू महाराज समाधी व जगदंबा मंदिरात दर्शन घेतले.

अधिका-यांचाही सन्मान

यावेळी ना . संजय राठोड यांच्या संकल्पनेतून समाजाच्या विकासासाठी महत्वपूर्ण योगदान देणारे मान्यवर तसेच पोहरादेवी व  परिसरातील विकासकामांसाठी विशेष सहकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा देखील सन्मान करण्यात आला. सर्व मान्यवरांना सेवाध्वजाची प्रतिकृती देऊन सन्मानित करण्यात आले.

Post a Comment

0 Comments