शत्रूच्या ताब्यातील प्रदेश जिंकावेत आणि तेथे आपले वर्चस्व निर्माण करावे एवढ्या अपेक्षेनेच पूर्वी विविध राजे, महाराजे लढया लढत असत. छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढ्या मर्यादित अपेक्षा ठेवून राज्य निर्माण केले नव्हते. शिवरायांनी गडांची उभारणी, तोफा, दारुगोळा, आरमार या सोबतच पर्यावरणाचे संरक्षण, जल व्यवस्थापन, स्वच्छतेविषयी दक्षता, वन संवर्धन आणि दुष्काळ निर्मुलन ही जनहिताची कार्ये हाती घेतली होती. आपसी लढायात गुंतलेल्या त्या काळातील इतर राजांच्या हे ध्यानीमनी सुध्दा नसावे! हेच महाराजांचे वेगळेपण असून म्हणूनच महाराज या राजांपेक्षा कितीतरी वेगळे ठरतात. ते खर्या अर्थाने जनतेचे पालक होते. जनहितासाठी आवश्यक असणारा विशाल दृष्टीकोण आणि संवेदनशीलता त्यांच्या ठायी होती. ते निर्विवाद मोठे यौद्धे होतेच. याबद्दल यत्किंचितही शंका नाही. मात्र त्यांची वरील जनहिताची कामे पाहता त्यांना यौद्धे म्हणण्यापेक्षा प्रजाहितदक्ष राजे म्हणण्यातच त्यांचा खरा गौरव आहे.
पर्यावरण रक्षण : “गडाची राखण म्हणजे कलारग्याची झाडी, ते झाडी प्रयत्ने वाढवावी. त्यामध्ये एक काठीही तोडों न द्यावी.” या आज्ञेवरुन शिवाजी महाराजांनी वन संवर्धनाला किती महत्व दिले होते हे लक्षात येते. आपल्या राज्यातील जंगले लोकांकडून नष्ट होणार नाहीत याकडे शिवरायांनी अधिक लक्ष दिले होते. आरमारासाठी लहान-मोठया नावा, जहाजे, वल्हे, सोट इत्यादी तयार करावे लागतात. त्यासाठी लाकूड लागते. म्हणून फक्त सागवानाचीच झाडे तोडावीत. अधिक सागवान पाहिजे असल्यास ते परक्या मुलकातून खरेदी करावे. परंतू कोणत्याही परिस्थितीत आंबे, फणस इ. झाडे तोडू नयेत. असली झाडे वर्षा दोन वर्षात तयार होत नाहीत. प्रजेने ही झाडे आपल्या मुलांसारखी वाढवलेली असतात. ती तोडून प्रजेला दु:ख देवू नये. अगदीच एखादे झाड जीर्ण झाले असेल तर त्या झाडाच्या मालकाला रोख पैसे देवून त्याचे समाधान करून मगच ते तोडावे. अशाप्रकारचे पर्यावरणाचे रक्षण करणारे अनेक हुकुम महाराजांनी दिले होते. शिवाजी महाराजांनी काही गडांवर आंबा, वड, नारळ, साग, शिसव अशी झाडे लावली होती. रायगडाच्या पायथ्याशी शिवरायांची मोठी आमराई म्हणजे आंब्याची बाग असल्याचे म्हटले जाते.
जल व्यवस्थापन : शिवरायांनी गावोगावातील छोटे मोठे बंधारे बांधून लोकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले. त्यामुळे स्वराज्याचे उत्पन्न वाढले. स्वराज्यातील रयतेला दुष्काळाची तिव्रता जाणवणार नाही याची काळजी महाराज घेत. शिवरायांच्या काळात गडावर वस्ती करून राहणाऱ्या प्रजेची संख्या मोठी होती. तेथे पाण्याची व्यवस्था करण्यासंबंधी शिवराय आदेश देत. “गडावर आधी उदक पाहून किल्ला बांधावा. पाणी नाही आणि ते स्थळ आवश्यक बांधणे प्राप्त झाले तरी आधी खडक फोडून तळी, टांकी पर्जन्यकाळपर्यंत संपूर्ण गडास पाणी पुरे अशी मजबूत बांधावी. गडाचे पाणी बहूत जतन राखावे.” गड बांधण्यापूर्वी त्या जागेवर पुरेसे पाणी आहे की नाही याची पाहणी केली जात असे. अशा एखादया जागी पाणी नसेल तर तेथे पावसाळयापूर्वी तळी आणि टाक्या बांधून पावसाचे पाणी त्यामध्ये साठविले जाई. हे साठवलेले पाणी जपून वापरले जाई. अशा जलव्यवस्थेमुळे गडावरील लोकांना आणि स्वराज्यातील प्रजेलाही पाण्याची टंचाई जाणवत नसे.
स्वच्छतेविषयी दक्षता :घरे आणि सार्वजनिक ठिकाणे अधिकाधिक स्वच्छ कशी ठेवता येतील यासंबंधीही शिवरायांच्या काळात उपाययोजना केलेल्या आढळतात. घराभोवती निर्गुडीच्या झाडाचे कुंपण घालून घरामध्ये उंदीर, विंचू, किडा, मुंगी यासारखे प्राणी येणार नाहीत याची दक्षता घ्यावी. त्याचप्रमाणे धूर करून आरोग्याला धोकादायक असणारे जंतू नष्ट करावेत अशाही आज्ञा शिवरायांनी दिलेल्या पाहायला मिळतात. गडावरील बाजारपेठेत, रस्त्यांवर केरकचरा राहणार नाही याची ताकीद देण्यात आलेली दिसते. इतकेही करून जागोजाग कचरा पडला असेल तर तो गडाखाली फेकू नये. तो कचरा त्याच जागेवर जाळून टाकावा आणि त्यापासून होणारी राख परडयातील भाजीपाल्यासाठी खत म्हणून वापरावी. अशा विविध सूचना महाराजांनी केलेल्या आढळतात. हागणदारी मुक्त गांव मोहिम अजूनही शासन राबवित असतांना छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या किल्ल्यांवर त्या काळी शौचकुप बांधुन घेतले होते. सिंधुदुर्ग या जलदुर्गावर 40 शौचकुप बांधुन घेतली होती. प्रतापगड आणि राजगडावरही शौचकुप बांधले असल्याचे पुरावे सापडले आहेत.
दुष्काळावर मात : त्याकाळीही दुष्काळी परिस्थिती होती. 1630 आणि 1650 मध्ये दुष्काळ पडल्याची नोंद सापडते. पावसाचा लहरीपणा लक्षात घेवून पाण्याचे व्यवस्थापन करण्याकडे महाराजांनी लक्ष दिले होते. म्हणूनच छत्रपतींना नुसते वॉरियर (योध्दे) म्हणणे योग्य होणार नाही तर ते खर्या अर्थाने जनतेचे वरीअर (प्रजाहितदक्ष) होते.
0 Comments