रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज


हर हर महादेव !! जय भवानी !!

अशी आरोळी ऐकली की आपोआप आपल्या डोळ्यासमोर येतात,आपल्या सर्वांचे लाडके छत्रपती शिवाजी महाराज.शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांसाठीच अत्यंत प्रेरणादायी आणि वंदनीय व्यक्तिमत्व आहे.शिवाजी महाराजांचा इतिहास,शौर्य कथा ऐकून आपण लहानाचे मोठे झालो.आता हाच वारसा पुढच्या पिढी पर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हे भारताच्या इतिहासातील एक महान योद्धा आणि कुशल प्रशासक होते.त्यांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला.शिवाजी महाराजांची आज ३९५ वी जयंती.शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले हे विजापूरच्या सुलतानाच्या सैन्यात एक प्रमुख सरदार होते,ते एक पराक्रमी योद्धा आणि कुशल प्रशासक होते.त्यांच्या या अनुभवाचा आणि नेतृत्वगुणांचा प्रभाव शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वावर होता.शिवाजी महाराजांच्या आधी स्वराज्य स्थापन करण्याचा प्रयत्न शहाजी राजांनी सुद्धा केला होता. त्यांनी शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी आवश्यक असलेलं धैर्य,नेतृत्व आणि युद्धकौशल्य शिकवलं. शिवाजी महाराजांच्या आई जिजाबाई एक अत्यंत समजूतदार आणि कणखर राजमाता होत्या. त्या स्वतः धैर्यशील आणि शौर्यवान होत्या. त्यांच्या या गुणांचा प्रभाव शिवाजी महाराजांवर पडला,ज्यामुळे ते पराक्रमी योद्धा बनले.जिजाबाई लहानपणापासूनच शिवाजी महाराजांना रामायण, महाभारत आणि इतर धार्मिक ग्रंथांच्या कथांद्वारे धर्म,न्याय, कर्तव्यनिष्ठा,राष्ट्रप्रेम आणि सत्याचे महत्त्व समजावून सांगत.त्या गोष्टी ऐकून छोट्या शिवाजीला स्फुरण चढे आणि आपणही आपल्या देशासाठी काहीतरी केलं पाहिजे असं वाटे. जिजाबाईंच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचे स्वप्न पाहिले.जिजाबाई महाराजांना सांगत की & "आपला देश पारतंत्र्यात असून त्याला स्वतंत्र करून मराठा साम्राज्याची स्थापना करायची जबाबदारी आपली आहे"; आणि म्हणूनच कदाचित अवघ्या सोळाव्या वर्षी शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकून आपल्या पराक्रमाची सुरुवात केली. कुठल्याही मोहिमेवर निघाल्यावर एक आई म्हणून जिजाबाईंना महाराजांची खूप काळजी वाटे पण त्यांनी ते कधी जाणवू दिले नाही उलट प्रत्येक मोहिम जिंकावी यासाठी त्या प्रोत्साहन देत. राजमाता जिजाबाई आणि शहाजी भोसले हे आजच्या काळातील पालकत्वाचे उत्तम उदाहरण आहे.आपल्या मुलांच्या जडण घडणीत पालकांचं योगदान कसं असावं हे आपल्याला नक्कीच यातून शिकता येईल. 

छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व स्तरावरच्या लोकांना एकत्र आणलं.त्यांनी तरुण लोकांना एकत्र आणून किल्ल्याचे बांधकाम सुरू केले.आपण या सगळ्यांना शिवाजी महाराज्यांचे मावळे म्हणून ओळखतो. शिवाजी महाराजचं आपल्या या मावळ्यांवर खूप प्रेम होतं ते फक्त त्यांचे साथीदार नसून महाराज मावळ्यांना स्वतःच्या कुटुंबाचा भाग समजत असत त्यांच्या आनंदाच्या,दुःखाच्या प्रसंगी महाराज त्यात सामील होत असत.पुढे मावळ्यांच्या सहकार्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली. यानंतर शिवाजी महाराजांनी अनेक गड किल्ले काबीज केले.कधी शक्ती तर कधी युक्ती या तंत्राचा वापर करून शिवाजी महाराजांनी अनेक मुघल राजांचा,सेनापतींचा पराभव केला.अफझलखान वध,शाहिस्तेखानावर हल्ला, आणि सुरतेची लूट असे अनेक पराक्रम शिवाजी महाराजांनी केले.आपला शत्रू हा कुठूनही अगदी समुद्रातूनही आपल्यावर हल्ला करू शकतो हे ओळखून त्यांनी नौदलची स्थापना केली. शिवाजी महाराज अत्यंत हुशार आणि दूरदर्शी राजे होते. फक्त स्वराज्य स्थापन करून उपयोग नाही तर त्याचे रक्षण करणारा, प्रजेची काळजी घेणारा एक राजा असणं सुद्धा महत्त्वाचं आहे असं ओळखून,१६७४ मध्ये रायगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि ते झाले "छत्रपती शिवाजी महाराज". स्वराज्याची शपथ महाराजांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी घेतली. अत्यंत बिकट परिस्थितीत त्यांनी धैर्य राखून आपलं सैन्य उभं केलं आणि मुघल राजवटी विरुद्ध न घाबरता उभे राहिले. कुठल्याही संकटाचा सामना हा अत्यंत धीराने आणि न घाबरता केला पाहिजे. शिवाजी महाराजांनी पुण्यातील लाल महालात मुक्काम ठोकलेल्या मुघल सेनापती शाहिस्तेखानावर रात्रीच्या वेळी अचानक हल्ला केला.या हल्ल्यात खान जखमी झाला आणि त्याची बोटे कापली गेली.या घटनेतून महाराजांच्या धाडस आणि गनिमी काव्याचे उदाहरण दिसते. जेव्हा आपल्याकडे शारिरीक बल कमी असेंल तर आपण आपल्या बुद्धीचा वापर केला पाहिजे.युद्धाच्या वेळी महिला आणि लहान मुलांवर हल्ला करायचा नाही ही महाराजांची सक्त ताकीद होती.ते फक्त राज्यातील किंवा घरातील नव्हे तर शत्रूच्या पक्षातील स्त्रीचा सुद्धा आदर करत असत.कल्याण मोहिमेदरम्यान,महाराजांच्या सैन्याने कल्याणच्या सुभेदाराची सून,जी अत्यंत सुंदर होती, तिला पकडून महाराजांसमोर हजर केले. महाराजांनी तिच्याकडे पाहून आपल्या सरदारांना उद्देशून सांगितले की, "अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो." यानंतर, त्यांनी तिची ओटी भरून,साडी-चोळी देऊन सन्मानाने तिला तिच्या घरी पाठवले. शिवाजी महाराजांनी सुरत शहरावर अचानक हल्ला करून तेथील संपत्ती स्वराज्यासाठी मिळवली.या मोहिमेत त्यांनी नागरिकांना त्रास न देता फक्त शत्रूच्या संपत्तीवर कब्जा केला.या घटनेतून त्यांच्या न्यायप्रियतेचे दर्शन घडते.याशिवाय महाराजांनी त्याच्या राज्यातल्या सर्व स्तरातल्या, सर्व जातीच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य स्थापन केले. महाराज प्रत्येकाला समानतेची वागणूक देत. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांमधील नाते हे अतूट विश्वास,प्रेम,मैत्रीचे आणि निष्ठेचे होते.महाराज आपल्या मावळ्यांशी समानतेने वागत,त्यांच्या मतांना महत्त्व देत,आणि त्यांच्या कष्टांची कदर करत.महाराजांनी आपल्या नेतृत्वाने मावळ्यांना प्रेरित केले,त्यांना स्वराज्याच्या उद्दिष्टांशी जोडले,आणि त्यांच्या क्षमतांचा पूर्ण वापर करून घेतला.मावळ्यांचं सुद्धा शिवाजी महाराजांवर खूप प्रेम होतं.तानाजी मालुसरे,सूर्याजी मालुसरे,सूर्याजी काकडे, येसाजी कंक, बाजीप्रभू देशपांडे,शिव काशीद,बहिर्जी नाईक,मुरारजी देशपांडे, कान्होजी आंग्रे, नेताजी पालकर यांच्यापैकी अनेकांनी स्वराज्य स्थापनेसाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. आपण आपल्यासोबत असणाऱ्या आपल्या मित्रांचा किंवा सहकाऱ्यांचा नेहमी आदर केला पाहिजे. राष्ट्रप्रेम आणि कर्तव्यनिष्ठा : महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी अथक प्रयत्न केले.त्यांच्या कार्यातून मुलांना देशप्रेम आणि कर्तव्यनिष्ठा शिकता येते.शिवाजी महाराजचं संपूर्ण जीवन आपल्यासाठी प्रेरणा देणारं आहे.त्यांचं देशप्रेम, कर्तव्यनिष्ठा,न्याय आणि समानता यासारखे अनेक गुण आपल्याला मुलांपर्यंत कसे पोहचवता येतील हे आपण पाहू या. कुठलंही माहिती ही गोष्टीरूपातून सांगितली तर ती मुलांना लवकर कळते आणि लक्षातही राहते. शिवाजी महाराजांच्या युद्धाच्या,शक्तीच्या युक्तीच्या गोष्टी तुम्ही मुलांना सांगू शकता.चिकूपिकूच्या "जंमत गोष्टी" अँप मध्ये तर शिवाजी महाराजांच्या गोष्टींची स्वतंत्र प्ले लिस्ट आहे.त्या तुम्ही मुलांना नक्की ऐकवा.लहान मुलांसाठी शिवाजी महाराजांवर आधारित अनेक पुस्तकं बाजारात उपलब्ध आहेत.आपल्या चिकूपिकूच्या पुस्तकात सुद्धा शिवाजी महाराजांच्या गोष्टी आहेत.ज्या लहान मुलांना काळातील अशा सोप्या भाषेत आहेत त्या नक्की वाचा. शाळेच्या स्नेहसंमेलनात,सोसायटी मध्ये होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात आपण लहान मुलांना एकत्र आणून शिवाजी महाराजांवर आधारित पोवाडे, नाटकातील प्रसंग सादर करू शकता.याठिकाणी मुलांच्या कला गुणांना तर वाव मिळेल आणि शिवाजी महाराजांविषयी मुलांना जास्तीत जास्त माहिती मिळेल.शिवाजी महाराज जयंती निम्मित शाळेत किंवा सोसायटीच्या सांस्कृतिक कार्यक्रमात आपण वेगवेगळ्या चित्रकला,निबंध,वक्तृत्व स्पर्धा आयोजित करून त्यांचा विषय हा शिवाजी महाराज ठेऊ शकतो.त्यानिमित्ताने मुलं महाराजांविषयी ऐकतील, वाचतील त्यांच्या विषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करतील.शिवाजी महाराजांच्या विषयी प्रश्नोत्तरे आणि वेगवेगळ्या चर्चा आयोजित केल्या जाऊ शकतात.थोड्या मोठ्या वयाची मुलं यात सहभागी होऊन त्याविषयीचा अभ्यास करतील.प्रेरणादायी शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित सुविचार,म्हणी घरात किंवा शाळेत तुम्ही फळ्यावर लिहू शकता ते मुलं येता - जाता वाचतील.छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जितकं बोलावं लिहावं तितकं कमीच आहे. एका ब्लॉग मध्ये महाराजांच्या चरित्राचा समावेश करणं म्हणजे समुद्राची खोली आणि आकाशाची उंची मोजण्याइतकी कठीण काम आहे.आपण फक्त त्यांच्याविषयी आदर बाळगून त्यांनी घालून दिलेल्या मूल्यांचं पालन करू शकतो आणि म्हणू शकतो."प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंत,सिंहासनाधीश्वर, योगीराज,श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. अश्या या थोर रयतेच्या राजाच्या जयंती निमित्ताने सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा.

पवन थोटे, यवतमाळ ९४०४५२६७७७

Post a Comment

0 Comments