'आशिया बुक ऑफ रेकॉर्डस्' मध्ये नोंदविणार विक्रम
देश, विदेशातील स्पर्धेत सहभाग
देव चौधरी हा आतापर्यंत देश, विदेशातील अनेक स्पर्धांमध्ये सहभागी झाला आहे. प्रत्येक स्पर्धेत त्याने धावण्याचा विक्रम नोंदवून पुरस्कार मिळविला आहे.
नागपूर येथे नुकत्याच झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात त्याच्या
हस्ते क्रीडा ध्वजाचे अनावरणच झाले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अभिनेत्री तथा खासदार कंगना रनौत यांच्या सोबतीने देवला हा सन्मान मिळाला
होता.
शेतकरी कुटुंबातील देव बनला 'फास्टेस्ट इंडियन'
पुसद तालुक्यातील श्रीरामपूर येथील
सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील देव चौधरी याने देश, विदेशातील अनेक मॅरेथॉन स्पर्धांमध्ये पारितोषिक प्राप्त केले. धावणारा
देव अशी त्याची ओळख आता सर्वत्र झाली आहे. वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी दक्षिण आफ्रिकेच्या
डर्बन सिटीत 'द अल्टिमेट ह्यूमन
रेस' या नावाने ओळखल्या
जाणाऱ्या सर्वांत खडतर अशा या अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये देव धावला. ९७ वर्षाच्या इतिहासात कॉम्रेड मॅरेथॉन जिंकून तो 'फास्टेस्ट इंडियन' बनला.
या स्पर्धेत देवने ८६ किलोमीटर अंतर सात तास चार मिनिटात पार केले व तो रौप्य पदकाचा
मानकरी ठरला.
पोलीस भरतीसाठी धावणा-या युवकाकडून प्रेरणा
देव वयाच्या अठराव्या वर्षापासून
विविध स्पर्धेत धावत आहे. पोलीस भरतीसाठी धावणारे युवक पाहून देवला प्रेरणा मिळाली.
आतापर्यंत त्याने दहा, एकवीस, बेचाळीस किलोमीटर मॅरेथॉन अशा एकूण ७० स्पर्धेत धावण्याची गती कायम
ठेवली आहे. २०२२ मध्ये बंगलोर येथे झालेल्या हेन्नूर बांबू अल्ट्रा १६१ किलोमीटर मॅरेथॉन
स्पर्धेत तो सतत १८ तास २४ मिनिटे धावला. त्याचे हे रेकॉर्ड अद्यपी कुणीही तोडू शकले
नाही.
तीन वर्ष गाजवली 'इंडियन बॅकयार्ड अल्ट्रा मॅरेथॉन'
'इंडियन
बॅकयार्ड अल्ट्रा मॅरेथॉन' त्याने सतत तीन
वर्ष गाजवली. दिल्ली येथे झालेल्या ‘इंडियन
बिग डॉग बॅक यार्ड अल्ट्रा’ या वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी
त्याने भारतीय चमुचे प्रतिनिधित्व केले. जयपूर येथे ‘ब्लॅक हॉर्स बॅक यार्ड अल्ट्रा’
मॅरेथोनमध्ये २२ तास,
पुणे येथे ‘स्वराज्य बॅक
यार्ड अल्ट्रा’मध्ये तो १२
तास धावला. ‘इंडियन बॅक यार्ड
अल्ट्रा मॅरेथॉन’मध्ये देव सलग
३६ तास धावला. पुणे येथे झालेल्या ‘जम्पिंग
गोरिला माउंटन ट्रेल’ या मॅरेथॉनमध्ये
सिंहगड परिसरात तो तब्बल १२० किलोमीटर सलग धावला व प्रथम विजेता ठरला. याशिवाय सिंहगड-
राजगड- तोरणा तसेच सिंहगड- राजगड- तोरणा- लिंगना यासारख्या ‘ट्रेल अल्ट्रा मॅरेथॉन’मध्येही
तो वेगवान धावक ठरला. त्याने ‘कास
अल्ट्रा’ ही ६५ किलोमीटरची मॅरेथॉन पाच तास ३८ मिनिटांत पूर्ण केली. याशिवाय
टाटा मुंबई मॅरेथॉन, टाटा अल्ट्रा
मॅरेथॉन लोणावळा यात सुद्धा त्याने सहभाग घेतला आहे.
२५ किमी दररोज धावतो
देवचा दिवस धावण्याने सुरू होतो.
दररोज किमान २५ किलोमीटर धावतो. त्यासोबतच स्विमिंग, जिम आदी व्यायाम प्रकार करतो. सहा फूट उंचीचा देव कधी थकत नाही. आईच्या
हातचे जेवण हाच त्याला उत्तम आहार वाटतो. धावण्यासाठी महिन्याला किमान २५ हजार रुपये
किमतीचे शूज देवला घ्यावे लागतात. त्याच्या शेतकरी कुटुंबाला हा खर्च झेपत नसल्याने
चाहते मदत करतात. देवजवळ असामान्य जिद्द आहे. कुठलाही कोच न घेता त्याने धावण्याची
स्पर्धा एकलव्याप्रमाणे जिंकली आहे. देव आता यवतमाळ येथे धावण्याचा नवीन विक्रम करणार
असल्याने त्याचा सराव करत आहे.
मान्यवर उपस्थित राहणार
या कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ.
पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे
मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की,
जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, डायट प्राचार्य डॉ. प्रशांत गावंडे, शिक्षणाधिकारी जयश्री राऊत,
जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड आदी अधिकारी, शहरातील गणमान्य नागरिक,
संस्था, क्रीडा संस्थाचे
पदाधिकारी, खेळाडू सहभागी
होणार आहे.
विद्यार्थी विक्रमाचे साक्षीदार होणार
देवपासून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी यासाठी सर्व शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी (दहावी, बारावीचे विद्यार्थी वगळून) १३ तास सलग धावण्याच्या या विक्रमाचे साक्षीदार होणार आहेत. यवतमाळकरांनी या सोहळ्यात सहभागी होऊन देव चौधरी याला प्रोत्साहन द्यावे असे आवाहन आम्ही यवतमाळकर क्रीडा प्रेमींनी केले आहे.
0 Comments