कोचिंग क्लासेच्या नावाखाली विद्यार्थ्यांची लुट

मनसे विद्यार्थी सेनेने केली कलेक्टरकडे तक्रार

यवतमाळ : शहरासह जिल्हातील सर्व तालुक्यात मोठ्या संख्येने कोचिंग क्लासेसचे पिक आले आहे. या कोचिंग क्लासेसकडून विद्यार्थ्यांची आर्थिक लूट सुरु आहे. मनमानी पद्धतीने अव्वाच्या सव्वा फि विद्यार्थ्यांकडुन घेण्यात येत आहे. या बाबतची तक्रार मनसे विद्यार्थी सेनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

विद्यार्थ्यांना आकारण्यात येणाऱ्या रकमेची पावती देणे बंधनकारक आहे. मात्र कोणत्याही कोचिंग क्लासेसकडून विद्यार्थ्यांना अशी पावती दिली जात नाही. ज्या ठिकाणी सेवा किंवा वस्तुची विक्री होते. त्यावर नियमानुसार वस्तू व सेवा (जीएसटी) कर आकारल्या जातो. परंतु यातील एकाही कोचिंग क्लासेसकडून हा कर वसूल केला जात नाही. त्यामुळे शासनाचे कोट्यवधींचे नुकसान होत अहे. ज्या इमारतीत हे क्लासेस चालतात, त्या इमारती व्यावसायिक स्वरूपाच्या असायला हव्या. मात्र जिल्हात कोणत्याही क्लासेसची इमारत व्यावसायिक स्वरूपाची नाही. कोचिंग क्लासेस चालविण्यासाठी परवानगीसुद्धा स्थानिक प्रशासनाकडून घेण्यात आली नाही. सर्व क्लासेस कुणाच्यातरी घरी चालविले जातात. त्यामुळे काही दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण असा सवालही उपस्थित होत आहे. जिल्हाधिका-यांना निवेदन देतांना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हा अध्यक्ष अभिजित नानवटकर, प्रथमेश पाटील, साईराम कवडे, सागर झपाटे, श्रेयस पांडे, तुषार कटपेलवार, सोनू गुप्ता यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते.  

घरगुती वीज मिटरचा वापर

कोचिंग क्लासेसमध्ये असलेले वीजमीटरसुद्धा घरगुती वापराचे आहे. या सर्व कोचिंग क्लासेसची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी अभिजीत नानवटकर यांनी केली आहे. कारवाई न झाल्यास शिकवणी वर्गाच्या विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

सुविधांचा अभाव

कोचिंग क्लासेसच्या ठिकाणी विद्यार्थी संख्येनुसार पाकिंगची, शौचालयाची, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असणे अपेक्षित आहे. मात्र अशा कुठल्याही व्यवस्था संबंधित क्लासेसमध्ये नसुन सुविधांचा अभाव आहे. 

आग विझविण्याचे यंत्रही नाही

गंभीर बाब ही की, याठिकाणी आग लागल्यास ती आग नियंत्रणात आणण्यासाठी कोणत्याही उपाययोजना किंवा फायर सेफ्टी नाही. त्यामुळे अचानक आग लागल्यास जीवितहानीची शक्यता आहे.


Post a Comment

0 Comments