शिक्षक भरती प्रक्रियेतून यवतमाळ जिल्हा वगळला

 बिंदूनामावलीत तपासण्या बंद असल्याने नोकर भरती बंद



यवतमाळ : शिक्षण विभागातील शासकीय व खासगी संस्थांमधील बिंदूनामावली अद्ययावत नसल्याने यवतमाळ सह राज्यातील आठ आदिवासीबहुल जिल्ह्यांमधील शिक्षक भरती बंद आहे. 27 फेब्रुवारी 2024 नंतर लागू झालेल्या एससीबीसी आरक्षणाचा उल्लेख करीत राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने तत्काळ आठ जिल्ह्यांची बिंदूनामावली तपासण्याचा स्वतंत्र जीआर तत्काळ काढावा, अशी मागणी यवतमाळ जिल्ह्या खासगी संस्था संचालक मंडळाने केली आहे.

राज्यात एससीबीसी आरक्षण 27 फेब्रुवारी 2024 रोजी लागू झाले. त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यांसह राज्यात नवीन बिंदूनामावली कार्यान्वित झाली. परंतु, राज्यातील आठ आदिवासीबहुल यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, धुळे, नंदुरबार, नाशिक, पालघर, रायगड आदी जिल्ह्यांसाठी अजून सामान्य प्रशासन विभागाने स्वतंत्र जीआर काढला नाही. नवीन आरक्षणानुसार प्रत्येक जिल्ह्यातील आदिवासींचे आरक्षण वेगवेगळे लागू होते, तो जीआर न काढल्यामुळे सर्व विभागाच्या बिंदूनामावली तपासण्या बंद आहेत.

पात्र शिक्षकांना रोजगार मिळणार नाही

बिंदूनामावली तपासली गेली नाही तर पदे निघणार नाही. नोकर भरती होणार नाही. त्यामुळे जिल्ह्यातील पात्र शिक्षकांना रोजगार मिळणार नाही. अनेक पात्र बेरोजगार वयोमर्यादा संपत असल्याकारणाने चिंतेत आहे. रोजगारासाठी त्यांना आठ जिल्हे सोडून इतर जिल्ह्यात जावे लागणार आहे. यवतमाळतच किमान 3000 शिक्षकांची पदे रिक्त आहे. शिक्षण विभागातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी खासगी व शासकीय शाळांमध्ये पवित्र पोर्टल टप्पा दोन कार्यान्वित झाले आहे त्याचीही मुदत संपत आलेली आहे.

बिंदूनामावरली उद्यावत नाही

जिल्ह्याची बिंदूनामावली अद्ययावत नाही. त्यामुळे यवतमाळ जिल्हा या पदभरतीमधून बाद झालेला आहे. येथे कुठलीही शिक्षकांची पदे भरली जाणार नाही. स्थानिकांना शिक्षकाची नोकरी मिळणार नाही. 27 फेब्रुवारी 2024 नंतर लागू झालेल्या एससीबीसी आरक्षणाचा उल्लेख करीत सामान्य प्रशासनाने तत्काळ आठ जिल्ह्यांचे बिंदूनामावली तपासण्याचा स्वतंत्र जीआर तत्काळ काढावा अशी मागणी खाजगी शिक्षण मंडळाने केली आहे.

लोकप्रतिनिधींनी प्रश्‍न सोडवावा

जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी या महत्त्वाच्या बाबीकडे लक्ष द्यावे शासन स्तरावरून हा प्रश्न सोडवावा अशी मागणी महाराष्ट्राचे उपाध्यक्ष वसंतराव घुईखेडकर, प्रवीण देशमुख, अध्यक्ष गणेशराव मोरे, उपाध्यक्ष जयंतराव घोंगे, सचिव अनिल गायकवाड, साहेबराव खडसे, सुहास देशमुख, श्रीनिवास धामनकर, बाळासाहेब धांदे, प्रकाश भूमकाळे, लक्ष्मणराव पवार, मुकुंदराव कदम, नितिन जैसवाल, मिलिंद रामटेके, बालासाहेब शिंदे, सिद्धार्थ भारती, आनंद वैद्य, गणेश म्हातारमारे, अमित सरोदे, अनिल सोनेवार, नाना गंडे, नीरज डफड़े, धनंजय पांडे, नीलेश बोरकर, किरण खड़से, विजय पाचपोर यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments