साहित्यिक देखील समाज सुधारकच : प्रा. गंगाधर अहिरे

 कारंजा (घाडगे) येथे दहावे आंबेडकरी साहित्य संमेलन

वर्धा : साहित्याचं मुख्य प्रयोजन दुःख मुक्त समाज निर्माण करणं आहे. दुःखाचे कारण बुद्धाने तृष्णा असल्याचे सांगितले. परंतु आजच्या जागतिकीकरणाच्या काळात भांडवलदार, धर्मांधशक्ती आणि भ्रष्ट सत्ताधारी यांचे झालेले संगणमत; हे बहुजनांच्या दुःखाचे कारण बनले आहे. म्हणून दुःख देणाऱ्या प्रवृत्तींचा आपण संघटितपणे व योजनापूर्वक सामना केला पाहिजे. त्यासाठी साहित्याच्या माध्यमातून उच्च मानवी मूल्यांचे रोपण करण्याची जबाबदारी साहित्यिकांची आहे. साहित्यिक हा देखील समाज सुधारकच असतो, हे पूर्वसरींच्या अभिव्यक्तीने सिद्ध केले आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक प्रा. गंगाधर अहिरे यांनी केले.

कारंजा (घाडगे) येथे आयोजित दहाव्या आंबेडकरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून प्रा. गंगाधर अहिरे बोलत होते. सम्यक साहित्य मंच या स्थानिक साहित्य संस्थेने साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते. स्वागताध्यक्ष बाबाराव सोमकुंवर हे होते. तर उद्घाटक प्राचार्य डॉ. अशोक पळवेकर हे होते. यावेळी प्रमुख अतिथी अ. भा. आंबेडकरी  साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळाचे निमंत्रक प्रशांत वंजारे, समीक्षक डॉ. अशोक इंगळे, प्रा. डॉ. प्रविण काळे आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.


साहित्यातून विद्रूप मुखवटा उजागर करावा

पुढे बोलताना संमेलनाध्यक्ष प्रा. अहिरे म्हणाले, आंबेडकरी साहित्य हे समता, स्वातंत्र्य, बंधुता, सामाजिक न्याय, करुणा आणि अहिंसक मार्गाने होणाऱ्या परिवर्तनाचा उद्घोष करते. मानव धर्माला अग्रस्थानी मानणाऱ्या या साहित्यातून अवघ्या माणूस जातीबद्दलचा मनस्वी कळवळा अविष्कृत होताना दिसून येतो. हाच वारसा जपून नितिवान व संघर्षशील समाज उभारणीत साहित्यिकांनी आपले योगदान दिले पाहिजे. त्यांनी आजच्या असंवेदनशील अशा सर्वग्रासी सत्ताकेंद्रांचा विद्रूप मुखवटा साहित्यातून उजागर करण्याचे धारिष्ट्य दाखवले पाहिजे. हेच आंबेडकरी साहित्याचे प्रयोजन आणि ऐतिहासिक कार्य सुद्धा आहे.

आंबेडकरी चळवळीवर परिसंवाद

यावेळी उद्घाटक प्राचार्य डॉ अशोक पळवेकर, कवी प्रशांत वंजारे, बाबाराव सोमकुंवर यांची सुद्धा भाषणे झालीत. दुसऱ्या सत्रात डॉ. अशोक इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली 'आंबेडकरी चळवळ: वाटचाल आणि आव्हाने' हा परिसंवाद संपन्न झाला. यात प्रा. अरविंद सुरोशे यांनी सहभाग घेतला. मुख्य कार्यक्रमाचे संचालन पुरूषोत्तम डोंगरे यांनी केले तर आभार प्रा. राजेश सवाई यांनी मानले. संमेलनाला परिसरातील साहित्य रसिकांचा उत्तम प्रतिसाद होता.

‘ते’ साहित्य ख-या अर्थाने आंबेडकरी : प्रशांत वंजारे

वर्धा जिल्ह्यातील कारंजा (घाडगे) येथे दहाव्या आंबेडकरी साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते. यावेळी संमेलनाचे प्रमुख अतिथी प्रशांत वंजारे यांनी 'साहित्य आणि सौंदर्य' या विषयावर भाष्य  केले. यावेळी ते म्हणाले की, सौंदर्य हे मूल्यमय आणि मूल्यभान असणारेच असते. माणूस जर मूल्यविहीन जीवन जगू लागला तर त्याची वाटचाल ही पशुत्वाकडेच होत असते. त्यामुळे सौंदर्याची कल्पना मूल्यांशिवाय करताच येत नाही. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि सामाजिक न्याय ही महामूल्ये सौंदर्याचा प्राणच आहे. मानवी जगणे सुसह्य आणि सुंदर होण्यासाठी या महामूल्यांचे अस्तित्व महत्त्वाचे आहे. म्हणून तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धांकडून स्वीकारलेली ही मूल्ये संविधानात प्रस्थापित केलीत. ही मूल्ये लोकशाहीचं सुद्धा सौंदर्य आहे. सौंदर्य हे मूल्यमय असते, पर्यायाने लोकशाहीमय सुद्धा असते. ही मूल्यमयता आणि लोकशाहीमयता जेव्हा साहित्यात येते तेव्हा ते साहित्य खऱ्या अर्थाने आधुनिक, खऱ्या अर्थाने वैश्विक आणि खऱ्या अर्थाने आंबेडकरी असते.

 

Post a Comment

0 Comments