जि.प. शिक्षण विभागाच्या विरोधात शिक्षकांचा एल्गार : 1 एप्रिलपासून बेमुदत साखळी उपोषण

यवतमाळ : जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या मनमानी आणि प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शिक्षण विभागाच्या विरोधात शिक्षकांनी एल्गार पुकारला आहे. विषय शिक्षक वेतनश्रेणीतील त्रुटी, विस्तार अधिकारी पदोन्नती आणि इतर न्याय्य मागण्यांसाठी 1 एप्रिल 2025 पासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण करण्यात येणार आहे.

20 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्र राज्य पदवीधर, प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटना जिल्हा शाखा यवतमाळ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या निष्क्रियतेविरोधात धरणे आंदोलन करण्यात आले होते. आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्या मध्यस्थीने शिक्षणाधिकारी प्रकाश मिश्रा यांनी 10 फेब्रुवारीपर्यंत मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र, दोन महिने उलटूनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने शिक्षक संघटनांनी पुन्हा संघर्षाचा मार्ग स्वीकारला आहे.  29 मार्चपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास 1 एप्रिलपासून आदेश मिळेपर्यंत बेमुदत साखळी उपोषण करण्यात येईल. यासंबंधीचे निवेदन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना दिले आहे. 

प्रमुख मागण्या : विषय शिक्षक वेतनश्रेणीतील त्रुटी दूर करून सुधारित आदेश काढावेत. उर्दू माध्यमाच्या विषय शिक्षकांचे वेतनश्रेणीचे आदेश त्वरित लागू करावेत. विस्तार अधिकारी पदोन्नतीसाठी समुपदेशन प्रक्रिया राबवावी. केंद्रप्रमुख पदोन्नतीसाठी शासन निर्णयानुसार 29 मार्चपूर्वी यादी प्रसिद्ध करावी. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक तसेच उच्च श्रेणी मुख्याध्यापकांसाठी तात्पुरत्या याद्या जाहीर कराव्यात.

निवेदन देतांना पदाधिकारी

यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्र वेरुळकर, शिक्षक सेनेचे अध्यक्ष प्रकाश सालपे, उर्दू शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष मो. रफिक, उच्च शिक्षित संघटनेचे अध्यक्ष निळकंठ कुलसंगे, पदवीधर संघटनेचे राजेश जुनघरे, अरुण महल्ले, रवींद्र बोबडे, महेश खोडके यांच्यासह अनेक शिक्षक उपस्थित होते.

 

Post a Comment

0 Comments