माजी खा. राउत यांनी पाठविली नितेश राणे यांना नोटीस ; ॲड. असिम सरोदे यांनी दिली माहिती

पुणे : मंत्रीपदाची शपथ संविधानाच्या कलम १६४ (३) नुसार घेताना ज्या संविधानिक कर्तव्याचे पालन करावे लागते. मात्र सदर संविधानिक जबाबदारी नितेश राणे पाळत नाहीत असा आरोप शिवसेना पक्षाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी केला आहे.

नितेश राणे काय म्हणाले ?

मंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे भारतीय जनता पक्षाचा मेळाव्याचे आयोजन दि. १३ मे  २०२२ रोजी केले होते. यावेळी ते म्हणाले की, येणाऱ्या दिवसांमध्ये मी तुम्हाला विश्वास देतो. जिल्हा नियोजनाची निधी असेल, पक्षाची, कुठलाही सरकारचा निधी असेल तो फक्त महायुतीच्याच कार्यकर्त्यांना भेटेल. बाकी कोणालाही भेटणार नाही. राणे यांनी असे सुद्धा वक्तव्य केले होते. जिथे जिथे उबाठा आणि महाविकास आघाडीचे सरपंच किंवा पदाधिकारी असतील त्या गावांमध्ये एक रुपयाचा निधी देणार नाही हे तुम्हाला आधीच सांगतो. कोणाला गावाचा विकास करायचा असेल तर महायुती मध्ये प्रवेश करून जा तरच काम होतील नाहीतर विकास होणार नाही.

माजी खा. विनायक राउत यांनी पाठविली नोटीस

मंत्रीपदावरील व्यक्तीने असे भेदभाव व विषमता पसरविणारे, द्वेषपूर्ण विधान करणे घटनाबाहय आहे तसेच संविधानाचा आणि लोकांचा अपमान असल्याने नितेश राणे यांना ही नोटीस पाठविण्यात आल्याची माहिती विनायक राऊत यांचे वकील अॅड. असीम सरोदे यांनी दिली आहे.

संविधानिक शपथेचा पडला विसर

कुणाहीबद्दल आकस, द्वेषभावना न ठेवता तसेच कुणाबद्दलही विशेष प्रेम न दाखवता, सगळ्या नागरिकांसाठी काम करण्यास बांधील राहील अशी शपथ मंत्री म्हणून नितेश राणे यांनी मंत्री म्हणून घेतलेली आहे, त्या संविधानिक शपथेचा त्यांना विसर पडला का? असा प्रश्न माजी खासदार विनायक राऊत यांनी नोटीस द्वारे उपस्थित केला आहे. नितेश राणे चुकीच्या प्रशासनाच्या दिशेने लोकशाहीला नेत आहेत आणि चुकीचा पायंडा महाराष्ट्राच्या राजकरणात निर्माण करीत आहेत म्हणून कायदेशीर नोटिस पाठवीत असल्याचे माजी खासदार विनायक राऊत म्हणाले.

राणे यांच्यावर अनेक गुन्हे

यापूर्वीही महाराष्ट्रामध्ये सर्वत्र एकात्मता व बंधुभाव याविरोधात वातावरण निर्माण हिंसकता पसरविण्याबद्दल नीतेश राणे यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याबाबतचा उल्लेख नोटीस मध्ये करण्यात आला आहे. मंत्री झाल्यावरसुद्धा नितेश राणे अशाच प्रकारे प्रक्षोभक वक्तव्य करून राष्ट्रीय एकात्मतेला बाधा आणण्याचे काम केले आहे. त्यामुळे कलम १६४(३) नुसार त्यांनी घेतलेल्या संवैधानिक शपथेचाच नाहीतर, संविधानाची मांडणी करण्यार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सुद्धा नितेश राणे अपमान करत आहेत असा आरोप नोटीस द्वारे करण्यात आला आहे.

तर राज्यपालाकडे केस दाखल करणार

कुडाळ येथे जे भाजपचे कार्यकर्ते असतील त्यांनाच विकास निधी देण्यात येईल अशाप्रकारचे भेदभाव व द्वेषपूर्ण वक्तव्य मागे घेतल्याचे नितेश राणेंनी त्वरीत जाहीर करावे. असे विषमतापूर्ण विधान यानंतर करणार नाही असे सांगावे. भारतीय संविधानाचा सन्मान करीत कलम १६४(३) नुसार मंत्रीपदाची घेतलेल्या शपथेचे प्रत्यक्षात पालन करीन असे जाहीर करावे अशी मागणी देखील नोटीस मध्ये करण्यात आली आहे. सदर कायदेशीर नोटीसेला १५ दिवसात उत्तर देण्यात आले नाही तर या विषयावरील महाराष्ट्रातील पहिली केस राज्यपालांच्याकडे दाखल करण्यात येईल असे अॅड. असीम सरोदे म्हणाले.

Post a Comment

0 Comments