लग्न समारंभातही वेधले शेतक-यांच्या समस्येकडे लक्ष
यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात प्रामुख्याने कापूस हे पीक घेण्यात येते त्यामुळेच पांढरा सोनं पिकवणारा जिल्हा म्हणून यवतमाळची शासन दप्तरी नोंद आहे. परंतु अलीकडच्या काळात कापसाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतीमालाला योग्य भाव मिळावा म्हणून अनेक राजकीय पक्षाने तसेच सामाजिक संघटना, शेतकरी संघटना यांनी आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले. परंतु शासनाला अजूनही जाग आली नाही त्यामुळे शेतकऱ्यात तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे. आता तर शेतकऱ्यांनी चक्क लग्न समारंभात कापसाला हमी देण्याची मागणी केली आहे.
यवतमाळ जिल्हा लगत असलेल्या अमरावती शहरात एका लग्न समारंभाचे आयोजन केले होते या लग्न समारंभात यवतमाळ जिल्ह्यातील काही शेतकरी वधू-वरांना सहभागी होण्यासाठी गेले होते. या लग्न समारंभात पाहुणे मंडळींनी वधू-वरांना शुभेच्छा दिल्यानंतर कापसाला भाव मिळालाच पाहिजे अशा घोषणा देत आगळेवेगळे आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या संदर्भाने बळीराजाला मानणारा प्रत्येक व्यक्ती शेतकऱ्यांचे दुःख आपल्या उराशी बाळगून असल्याने त्यांच्या भावना तो कुठे व्यक्त करेल याचा नेम नाही.असाच एक आगळा वेगळा प्रकार करीत कापसाला भाव मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे.या अनोख्या शैलीने नारे देत सगळ्यांचे लक्ष वेधत अमरावती येथील व्यंकटेश लॉन मधील उदयसिंह भदोरिया यांचे मुलाचे लग्न समारंभात पहायला मिळाला.
0 Comments