आंबेडकरी कविता धम्मक्रांतीची फलश्रुती - अशोक बुरबुरे

दुसऱ्या आंबेडकरी काव्यसंगीतीचे थाटात उद्घाटन


अमरावती : मूल्यभान हरवलेला समाज कोणतीही नवनिर्मिती करू शकत नाही. मूल्यविहीन निर्मितीला साहित्य म्हटले जात नाही. साहित्याच्या निर्मितीसाठी एखादी क्रांतिकारी घटना जबाबदार असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५६ साली अस्पृश्य समूहाला बुद्ध धम्माची  दीक्षा दिली. त्यातून नव्या संस्कृतीचा जन्म झाला. उपेक्षित समूहाला जगण्यासाठी नवीन जीवनमूल्ये मिळालीत. याच क्रांतिकारी घटनेने एका नव्या साहित्याला जन्म दिला, त्यालाच आपण आंबेडकरी साहित्य असे म्हणतो. त्यामुळे आंबेडकरी कविता ही धम्मक्रांतीची फलश्रुती आहे असे प्रतिपादन जेष्ठ कवी आणि विचारवंत अशोक बुरबुरे यांनी केले. ते अ. भा. आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळाच्या वतीने आयोजित दुसऱ्या आंबेडकरी काव्यसंगीतीचे अध्यक्ष म्हणून बोलत होते. यावेळी विचार मंचावर डॉ. अशोक पळवेकर, अरविंद सुरवाडे, डॉ. सीमा मेश्राम आणि महामंडळाचे निमंत्रक प्रशांत वंजारे उपस्थित होते. 

अशोक बुरबुरे म्हणाले, समकालीन सामाजिक वास्तव हे भयंकर आहे. सामान्य माणसाचे जगणे कठीण झाले असून तो सर्वार्थाने नागवल्या जात आहे. देशातील लोकशाही हतबल असून मुठभरांचे राज्य या देशावर प्रस्थापित झाले आहे. सर्व सवैधानिक संस्था मोडकळीस आलेल्या असून एका नव्या लढाईचे सुतोवाच समकालीन परिस्थितीतून पुढे येत आहे. अशा परिस्थितीमध्ये आंबेडकरी कवी आणि साहित्याची जबाबदारी मोठी आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुभाव या मूल्यांचे संवर्धन करण्यासाठी सकस आणि आक्रमक कवितेची गरज आहे.

डॉ. पळवेकर आपल्या बीज भाषणात म्हणाले, जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे निर्माण झालेल्या मानवी अस्तित्वाच्या कोंडीचे अत्यंत विस्तृत पटल अलीकडच्या काळात आंबेडकरी कवितेत स्पष्टपणे उलगडून दाखवले आहे. या कवितेत शोषित, पीडित, सर्वहारा आणि शेतकरी या सर्वांच्या जगण्याची वेदना व दुःख आहे. त्या व्यवस्थेच्या दुःख निर्मिती प्रकल्पांची अनेक रूपके या कवितेने वीरचित केलेली आहेत. त्यातून सर्वसामान्यांच्या शोषणासाठी वापरली जाणारी अनेकविध प्रतीके आणि प्रतिमांच्या रूपबंधाचे वेगवेगळे कोन या कवितेतून उजागर झालेले आहेत. सर्वसामान्यांच्या दुःख वेदनेची मुळे उघड करून त्यावर हल्लाबोल करणारी संवेदना घडवणारी एक शोषणविरोधी तत्त्वज्ञानाची जीवनदृष्टी ही आंबेडकरी कवितेच्या मूलस्थानी आहे.

प्रा. सतेश्वर मोरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित आंबेडकरी काव्यसंगीतीच्या मुख्य कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय मोखडे यांनी तर आभार प्रदर्शन विलास थोरात यांनी केले. कार्यक्रमाला प्रा. सतेश्वर मोरे स्मृती प्रतिष्ठान, साप्ताहिक वज्जी संदेश, शिल्पकार फाउंडेशन या स्थानिक संस्थांनी सहकार्य केले.

अ. भा. आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळाचे निमंत्रक प्रशांत वंजारे म्हणाले, आंबेडकरी कवितेतून येणारे सामाजिक संदर्भ हे अधिक टोकदार असून या कवितेने एकूणच मराठी साहित्याचा चेहरामोहरा बदललेला आहे. साहित्यातून मूल्य जाणीव रुजवण्याचे आणि व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचे धाडस सर्वप्रथम आंबेडकरी कवितेने केलेले आहे. त्यामुळे समकालीन अनागोंदीच्या काळात आंबेडकरी कविता हे दीपस्तंभासारखे कार्य करेल याची खात्री आहे. नव्या प्रतिभांना विचारमंच उपलब्ध  करून देणे , त्यांना साहित्य प्रवाहाशी जोडणे हा या आंबेडकरी काव्यसंगीतीचा उद्देश आहे.

Post a Comment

0 Comments