आंबेडकरी काव्यसंगीतीत कवितेवर विचारमंथन
अमरावती : वर्षानुवर्षांचा खदखदणारा लाव्हा पृथ्वीच्या उदरातून ज्वालामुखीसारखा बाहेर पडावा तसा आंबेडकरोत्तर दशकात शोषित-पीडित जीवन जगून आंबेडकरी विचारांचे वारे प्यालेल्या नवदिक्षित पिढीने आपल्या भाव-भावना आणि विद्रोह कवितेच्या माध्यमातून व्यक्त करायला सुरुवात केली आणि आंबेडकरी कविता उदयास आली. १९५६ च्या ऑक्टोबर क्रांतीने आंबेडकरी कवितेला एक नवी दिशा मिळाली, एक नवे सांस्कृतिक कलामूल्य मिळाले, बौद्ध संस्कृतीचा वारसा मिळाला. आत्मशोध घेऊन आत्मोद्धार करण्यासाठी या कवितेने उघड उघड बुद्ध विचार स्वीकारून बौद्ध संस्कृती विकसित करण्यासाठी आंबेडकरी कविता लिहिली जाऊ लागली. त्यामुळे बौद्ध संस्कृतीच्या समृद्धीसाठी आंबेडकरी कविता हे महत्त्वाचे साधन असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक अरविंद सुरवाडे यांनी केले. ते अमरावती येथे आयोजित आंबेडकरी काव्यसंगीतीतील परिचर्चेत अध्यक्ष म्हणून बोलत होते.

अरविंद सुरवाडे म्हणाले, आंबेडकरी कवींनी जातक कथा, धम्मपद यासारख्या बौद्ध वाङमयात अंतर्भूत असलेली काव्य लक्षणे, काव्यालंकार, रूपके, उपमा, प्रतिमा, दृष्टांत, कौशिकी किंवा सौंदर्यवेध, विदग्धता, लोकधर्मिता, नाट्यधर्मिता इ. वाङमयीन संकल्पनांचा अभ्यास करावा. केवळ शब्दांची सुसंगत मांडणी आणि उत्स्फूर्त आविष्कार म्हणजे काव्य हा समज दूर सारायला हवा. ज्या कवितेला तिच्या काळातील महत्त्वाचे प्रश्न आणि भयावहतेची गंभीर चिंता नाही, नवी. दिशा शोधण्याची दृष्टी नाही आणि इच्छाही नाही, अशी कविता रूप आणि कलेच्या पातळीवर कितीही चमत्कार घडवून आणत असली, कृत्रिम नवोपक्रमाचे हवे तितके बुडबुडे निर्माण करू शकली, बंडखोरी-विद्रोह केल्याचे दाखवत असली तरीही ती शेवटी विस्मृतीच्याच गर्तेत आणि इतिहासाच्या कचरा कुंडीतच जमा होते.
'आंबेडकरी प्रमाणशास्त्र आणि आंबेडकरी कविता : एक शोध' या विषयावरील चर्चेत सहभाग नोंदवताना चर्चक डॉ. प्रकाश राठोड म्हणाले, आपण लिहितो तो शब्द आपल्याला जगता आला पाहिजे. आपण अनेक वर्षांपासून लिहीत आहोत, बोलत आहोत पण माणसं पेटत नाही कारण आपल्या लिहिण्यात आणि जगण्यात आंतर्विरोध आहे अशी आंतर्विरोधग्रस्त कविता आंबेडकरी प्रमाणशास्त्राची कविता ठरत नाही. आपली कविता प्रश्नांच्या काळजाशी भिडली पाहिजे. प्रश्नांच्या उगम स्थानाला या कवितेने हात घातला पाहिजे. जातीयता आणि धर्मांधतेची दुर्गंधी ज्या क्षितिजातून येत आहे ते क्षितिज या कवितेने नाकारले पाहिजे. ही नकाराची ताकद आपल्याला डॉ. बाबासाहेबांनी दिली आहे. आंबेडकरी प्रमाणशास्त्राची कविता गहन आशयाची कविता असते. संविधान, स्वातंत्र्य आणि देश अडचणीत असताना आंबेडकरी कवितेची जबाबदारी वाढली आहे.
शोषणसत्ताकाचा सापळा आणि आंबेडकरी कविता या विषयावर ॲड. आनंद गायकवाड, भारतीय संविधान मूल्ये आणि आंबेडकरी कविता या विषयावर डॉ. गजानन बनसोड, आंबेडकरी कविता: आशय आणि अभिव्यक्ती या विषयावर प्रा. प्रदीप लोहकरे यांनी चर्चक म्हणून सहभाग नोंदविला. परिचर्चेचे संचलन प्रा. संजय घरडे यांनी तर आभारप्रदर्शन राजेश गरूड यांनी केले.
0 Comments