सुमित खेळणार कबड्डीचे नॅशनल!


यवतमाळ : दिग्रस येथील ईश्वर देशमुख सैनिक शाळेचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी सुमित नामदेव राठोड याची नॅशनल सब ज्युनियर स्पर्धेसाठी निवड झाली आहे. नुकत्याच चंद्रपूर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेतून त्याने थेट नॅशनलचा टप्पा गाठला आहे. सुमितच्या या यशाने कबड्डीची पंढरी असलेल्या दिग्रस शहरात आनंद व्यक्त केला जात आहे. 

चंद्रपूर येथे झालेल्या विदर्भ  राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये यवतमाळ जिल्ह्याकडून खेळत असताना उत्कृष्ट कबड्डी खेळाचे प्रदर्शन करीत सुमितला हे यश गाठता आले.  सुमित नामदेव राठोड हा मेंडकी ता. माहूर येथील रहिवासी असून तो शिक्षणासाठी दिग्रस येथे आला होता. घरची परिस्थिती अतिशय बेताची असणाऱ्या सुमिताने नुकतीच दहावीची परीक्षा सुद्धा दिली आहे. दहावीचा निकाल येण्यापूर्वीच त्याने कबड्डीत हे घवघवीत यश मिळविले आहे. मेहनती विद्यार्थी म्हणून सुमितची शिक्षकांमध्ये ओळख आहे. गया, बिहार येथे 35 व्या सब ज्युनिअर नॅशनल कबड्डी स्पर्धा 27 ते 30 मार्च 2025 रोजी पार पडणार आहेत. त्यासाठी तो लवकरच गया येथे जाणार असल्याची माहिती त्याचे प्रशिक्षक सादिक गारवे यांनी दिली. सुमितने आपल्या  यशाचे श्रेय त्याचे आई, वडील आणि क्रीडा शिक्षक सादिक गारवे यांना दिले आहे. त्याच्या या यशाबद्दल खा. संजय देशमुख, आंतर राष्ट्रीय कबड्डीपटू प्यारेलाल पवार, प्राचार्य नितीन धनवंत, शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेचे जयवंत सास्तीकर, फैजान शेख, अविनाश गलाट, फारुक चव्हाण, अजीम शेख, असिफोद्दीन काजी यांनी सुमितचे कौतुक केले आहे.

Post a Comment

0 Comments