यवतमाळ : यवतमाळच्या वीर वामनराव चौकात विजेच्या रोहित्रावर अडकलेल्या दोन माकडांचा एम. एच. 29 हेल्पिंग हॅण्ड टीमने जीवाची बाजी लावून यशस्वी रेस्क्यू केला. मात्र, विजेच्या धक्क्याने गंभीर जखमी झालेल्या गर्भवती माकडीणीला वेळीच उपचार मिळाले नाहीत आणि ती आपल्या पोटातल्या पिल्लासह तडफडत दगावली! ही केवळ एका मुक्या जीवाची मृत्यू नाही, तर माणुसकी आणि जबाबदार संस्थांच्या अपयशाची शोकांतिका आहे! रेंज ऑफिसर अमर सिडाम आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळकाढूपणा केला नसता, तातडीने मदत केली असती, तर हा जीव वाचू शकला असता असा आरोपही केला आहे. एका नव्या जीवनाचा अंकुर फुटण्या आधीच खुडला गेला. याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित होत आहे.
या घटनेने कृषी तथा वन्यजीव अभ्यासक प्रा.पंढरी पाठे आणि एम. एच. 29 हेल्पिंग हॅण्ड वन्यजीव संघटनेच्या सक्रिय सदस्यांचे संतप्त मन हेलावले. त्यांनी वनविभागाच्या निष्क्रियतेचा तीव्र निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली. वन्यजीव रक्षणाच्या जबाबदारीवर कोणीही लक्ष देत नसल्याने त्यांनी शासनाकडे कठोर कारवाईची मागणी केली.
निसर्ग प्रेमींची मागणी
यवतमाळमध्ये तातडीने वन्यजीव उपचार केंद्र सुरू करा! वन्यजीवांसाठी त्वरित वैद्यकीय सुविधा उपलब्ध कराव्यात. निष्क्रिय अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी. विद्युत रोहित्र आणि इतर धोकादायक ठिकाणी सुरक्षाव्यवस्था करण्यात यावी.
0 Comments