नंददीपला महाराष्ट्र महागौरव पुरस्कार जाहीर, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

यवतमाळ :  मनोरुग्णांच्या पुनर्वसनाचा विडा उचलणाऱ्या संदीप व नंदिनी शिंदे यांच्या नंददीप फाऊंडेशनला गोव्यातील डिजिटल मीडिया संपादक व पत्रकार संघटनेच्या वतीने दिला जाणारा यंदाचा महाराष्ट्र 'महागौरव पुरस्कार २०२५' जाहीर झाला आहे. ६ एप्रिलला सावंतवाडी येथे होणाऱ्या तिसऱ्या महाअधिवेशनात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिंदे दाम्पत्याला गौरविण्यात येणार आहे. ६ एप्रिलला सावंतवाडी (सिंधुदुर्ग -कोकण) येथील भोसले नॉलेज सिटी येथे होत असलेल्या तिसऱ्या महाअधिवेशनात हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे.सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, माजी शिक्षणमंत्री आ.दीपक केसरकर, खा. नारायण राणे, आ. नीलेश राणे यांच्यासह गणमान्य मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. आठ वर्षांपूर्वी एकट्या संदीप शिंदे यांनी सुरू केलेल्या मनोरुग्णसेवेला आज व्यापक लोकचळवळ लाभली आहे. अल्पावधीतच नंददीपच्या कार्याने देशभरात मनोरुग्णांच्या पुनर्वसनाकडे अंगुलीनिर्देश केला आहे. आजपर्यंत देशातील विविध राज्ये आणि शेजारी देशातून तब्बल ६९९ बेघर मनोरुग्णांना केंद्रात आश्रय देण्यात आला. यापैकी मेंदुरोग तज्ज्ञ डॉ श्रीकांत मेश्राम यांच्या मानसोपचारातून ५७२ मनोरुग्णांचे यशस्वी पुनर्वसन करण्यास संस्थेला यश आले. असून आज घडीला १२७ मनोरुग्ण येथे उपचाराधीन आहेत.

नंददीपकडून मनोरुग्ण सेवेसोबतच निराश्रितांना दोन वेळेचे जेवण, बेवारस मृतदेहाचे अंत्यसंस्कार तसेच शारीरिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मदत केली जाते.संस्थेच्या याच कार्याची दखल घेत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने, विदर्भ कार्याध्यक्ष नरेंद्र वैरागडे तसेच कार्यकारी मंडळाने या पुरस्कारासाठी नंददीपची निवड केली आहे.

Post a Comment

0 Comments