यवतमाळ : डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे आपल्या अनुयायांसह पाण्यासाठी सत्याग्रह केला होता. त्या ऐतिहासिक महाड क्रांती दिनाचे औचित्य साधून एससी एसटी ओबीसी भटक्या विमुक्त जमाती आणि अल्पसंख्याक महासंघाच्या वतीने दिनांक २० मार्च रोजी बि. एस. बुटाला सभागृह महाड येथे सामाजिक समता परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
देशात सामान्य माणसाचे जगणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. भारतीय संविधानाचे सुरक्षा कवच सैल करण्याचे षडयंत्र जोरात आहे. परस्पर सामाजिक सौहार्द नष्ट करण्यात येत असून सामाजिक आणि धार्मिक धृवीकरणातून द्वेष निर्माण करण्यात येत आहे. धर्मांधता उच्च शिखरावर पोहोचली आहे. त्यामुळे बहुजनांच्या मूलभूत प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्या जात आहे. आरक्षण, रोजगार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य या महत्त्वाच्या गोष्टींकडे जनतेचे आणि शासनाचे लक्ष वेधण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. सामान्य माणसांच्या हक्कासाठी ही राष्ट्रव्यापी जनआंदोलनाची सुरूवात असेल अशी माहितो प्रशांत वंजारे यांनी दिली आहे.
महाड येथे नियोजित समता परिषदेच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार विजयराव मोरे राहणार असून बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम, विरोधी पक्षनेते भास्कर जाधव, माजी खासदार हुसेन दलवाई, पद्मश्री लक्ष्मण माने, माजी आमदार ॲड. जयदेव गायकवाड, प्रा. सुकुमार कांबळे, गौतमीपुत्र कांबळे, डॉ. लता प्र. म. ,अरूण जावळे, नारायण जावळीकर, विलास माने, जिजाऊ राठोड, दिपा पवार,आदी मान्यवर परिषदेला संबोधित करणार आहेत. प्रशांत यादव हे परिषदेचे स्वागताध्यक्ष असतील. या परिषदेला उपस्थित राहून सहकार्य करण्याचे आवाहन महासंघाचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष प्रशांत वंजारे यांनी केले आहे.
0 Comments