संतसाहित्यातील प्रबोधनाचे मनन व सदाचरण आज गरजेचे

विदर्भस्तर संतसाहित्य संमेलनाचे यवतमाळमध्ये उदघाटन

यवतमाळ : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यांसह अक्षर साहित्यातून जनकल्याणार्थ ओवी- अभंगांसह इतर गद्य, पद्य , सुविचार- सुवचने असे प्रबोधनपर लिखाण करणा-या संतलेखकांच्या विचारांचे मनन करुन तसे आचरण करणे आजच्या व भावी पिढीसाठी गरजेचे आहे, असे प्रतिपादन जनार्दनपंत बोथे ( गुरुकुंज मोझरी ) यांनी रविवारी यवतमाळला केले .‌

‌‌  भारतीय विचार मंच, शाखा यवतमाळ व संस्कृती संवर्धक मंडळ, यवतमाळ यांनी संयुक्त आयोजिलेल्या‌ ११व्या विदर्भस्तर संत साहित्य संमेलनाचे उदघाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी निवृत्त प्राध्यापक व संमेलनाध्यक्ष डॉ. रमाकांत कोलते होते . 

महर्षी गृत्समद व्यासपीठावर पद्मश्री पुरस्कारप्राप्त सेंद्रीय शेतकरी सुभाष शर्मा, स्वागताध्यक्ष धनंजय तांबेकर, श्रीधर गाडगे ( विदर्भ प्रांत सहसंघचालक ) , रविंद्र मुळे ( अहिल्यानगर ) , डॉ.‌सुभाष लोहे ( आर्वी ) , विजय कोषटवार ( संस्कृती संवर्धक मंडळ अध्यक्ष ) , संमेलन संयोजक डॉ. ताराचंद कंठाळे होते.

 दीपप्रज्वलनाने संमेलनाचे उदघाटन झाल्यानंतर श्रीविठ्ठलाच्या सावळ्या, समचरण मूर्तीचे मान्यवरांनी पूजन केले. ' संतांची मांदियाळी ' या प्रा. संगीता वायचाळ, गजानन वाचाळ व अतुल गंजीवाले संपादित संमेलनपुस्तकाचे विमोचनही त्यांनी  केले. भारतीय विचार मंचाचे डॉ.‌ सतपाल सोवळे यांनी प्रास्ताविकातून भूमिका विशद करताना आयोजकांच्या अंतर्यामी 'अजि सोनियाचा दिनु... ' अशी भावना असल्याचे सांगितले. 

अध्यक्ष डॉ. रमाकांत कोलते यांनी भाषणातून संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत सावता माळी, संत सेना न्हावी यांच्या लेखनकार्याचा आढावा घेऊन ' जसे सांगतात व लिहितात, तशी कृती, आचरण करतात ते खरे संत ' , अशी व्याख्या मांडली.‌ स्वागताध्यक्ष धनंजय तांबेकर यांनी मनोगतातून जीवनातील अडचणी, कसोटीच्या प्रसंगातून मार्ग काढताना संतांचे जीवनव्यवहारविषयक वाड्मय उपयोगी पडते असे मत मांडले. सूत्रसंचालन डॉ.‌ ललिता घोडे- जतकर यांनी केले.‌आभार सहसंयोजक अतुल देशकर यांनी मानले‌ . सकाळी यवतमाळ शहरामधून‌ ' ग्रंथदिंडी ' काढण्यात आली . डॉ‌.‌किशोरी केळापुरेंच्या मार्गदर्शनाखाली लावलेले संतचरित्र आणि वाड़्मयावरील चित्रप्रदर्शन उपस्थितांच्या माहितीत भर टाकणारे होते .

‌‌

Post a Comment

0 Comments