अमरावती : अ. भा. आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळाच्या वतीने अमरावती येथे आंबेडकरी काव्यसंगीतीचे आयोजन दिनांक ९ मार्च रोजी करण्यात आलेले आहे. काव्यसंगीतीचे अध्यक्षपद ज्येष्ठ कवी अशोक बुरबुरे भूषविणार असून संगीतीचे बीजभाषण ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अशोक पळवेकर हे करणार असल्याची माहिती अ. भा. आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळाचे निमंत्रक प्रशांत वंजारे यांनी दिली.
धम्मक्रांतीचे संदर्भ असलेल्या आंबेडकरी कवितेतील बदलांचा, स्थिती गतीचा अभ्यास करणे आणि समकालीन आव्हानांना आंबेडकरी कविता कशी सामोरी जात आहे याची चर्चा आणि चिकित्सा करणे हा सदर काव्यसंगीतीचा उद्देश आहे. कवितेच्या संदर्भात विचारमंथन घडून आले पाहिजे आणि नव्या प्रतिभांना सर्जनाचे नवे अवकाश उपलब्ध करून दिले पाहिजे यासाठी सुद्धा सदर काव्यसंगीतीचे प्रयोजन आहे.
आंबेडकरी कवितेवर मूलभूत चिंतन होणार
आंबेडकरी कवितेवर मूलभूत चिंतन व्हावे यासाठी विविध विषयांवर परिचर्चा आयोजित केली आहे. परिचर्चेच्या अध्यक्षस्थानी समिक्षक अरविंद सुरवाडे असणार आहेत तर चर्चक म्हणून ॲड. आनंद गायकवाड, डॉ. प्रकाश राठोड, डॉ. गजानन बनसोड, प्रा. प्रदीप लोहकरे आदी सहभागी होतील. समारोपीय सत्रात कवीसंमेलन आयोजित करण्यात आले असून राज्यभरातील गणमान्य कवी यात सहभागी होतील. कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी कवी आणि गझलकार विनोद बुरबुरे असतील. सदर कवी संमेलनाचे संचलन चाफेश्वर गांगवे आणि कपिल दगडे हे करणार आहेत.
स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह भीम टेकडी परिसरात हे आयोजन करण्यात आले आहे. प्रा. सतेश्वर मोरे स्मृती प्रतिष्ठान, साप्ताहिक वज्जी संदेश आणि शिल्पकार फाउंडेशन या संस्था संगीतीच्या सह आयोजक असणार आहे. सदर काव्यसंगीतीला उपस्थित राहून सहकार्य करण्याचे आवाहन महामंडळाच्या अध्यक्ष डॉ. सीमा मेश्राम, माया वासनिक, धर्मशील गेडाम, विलास थोरात, राजेश गरूड, संजय घरडे, संजय मोखडे आदींनी केले आहे.
0 Comments