यवतमाळ : दारव्हा तालुक्यातील पिंपळखुटा
येथील शाहू राहुल जगताप या युवकाची इंडियन नेव्हीत निवड झाली आहे. त्यानिमित्त पालकमंत्री
तथा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी पिंपळखुटी येथे युवकाच्या घरी
जाऊन त्याचा सत्कार केला. जिल्ह्यातील युवकांनी शाहूचा आदर्श घेऊन आयुष्यात स्वप्नांना
वास्तवाची जोड द्यावी, असे याप्रसंगी सांगितले.
पिंपळखुटा येथे आगमण झाल्यानंतर पालकमंत्र्यांनी
शाहू जगताप यांच्या घरी भेट दिली. यावेळी त्यांनी युवक व त्याच्या कुटुंबियांशी संवाद
साधला. त्यानंतर गावात झालेल्या छोटेखानी सत्कार समारंभात पालकमंत्र्यांनी शाहूसह त्याच्या
आई वडिलांचा देखील शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन
सत्कार व गौरव केला. यावेळी दारव्हाचे उपविभागीय पोलिस अधिकारी तथा सहाय्यक पोलिस अधीक्षक
रजनिकांत चिलुमूला, उपविभागीय अधिकारी विजय सुर्यवंशी, तहसिलदार रवि काळे, पिंपळखुटाच्या सरपंच
सुनिता वाघमारे, उपसरपंच अरुणा पवार, विनोद महाराज, बाबूलाल चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाहूचा विद्यार्थ्यांनी आदर्श घ्यावा
इंडियन नेव्हीत निवड झाल्याबद्दल पालकमंत्र्यांनी
अभिनंदन व कौतूक केले. शाहूसारखा आदर्श इतर विद्यार्थ्यांनी घ्यावा. माझ्या मतदारसंघात
अनेक युवक मेहनतीने उच्च पदावर नियुक्त होत आहे. विद्यार्थ्यांना आवश्यक सोई-सुविधा
उपलब्ध करून दिल्या जात आहे. विद्यार्थ्यांनी मेहनत करावी व आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात
साकार करावे, असे पालकमंत्री पुढे बोलतांना म्हणाले. यावेळी उपविभागीय अधिकारी
विजय सुर्यवंशी यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
0 Comments