अज्ञात वाहनाची धडक : दुचाकीस्वार ठार; एक जण जखमी

यवतमाळ : शिवजयंतीचा कार्यक्रम पाहुन घराकडे परत जात असताना अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला. तर एक जण जखमी झाला आहे. ही घटना दिग्रस शहरातील दिग्रस पुसद पुलावर दि. १७ मार्च २०२५ रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान घडली.
पवन शंकर राठोड (वय १५) रा. रुई मरसुळ असे मृतकाचे नाव आहे. तर रोशन रामेश्वर राठोड (वय १३) दोन्ही रा. रुई मरसुळ असे जखमीचे नाव आहे. दिग्रस येथून दुचाकी क्रमांक एम एच १५ सी जी ०५६८ ने मृतक पवन राठोड व रोशन राठोड (वय -१३) दोन्ही रा. रुई मरसुळ आपल्या गावी दिग्रस पुसद पुलावरून जात होते.  एका अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. त्यात पवन शंकर राठोड हा जागीच ठार झाला. तर रोशन रामेश्वर राठोड हा गंभीर जखमी झाला आहे.  घटनास्थळावरून अज्ञात वाहन पसार झाले आहे. मृतक व जखमीला दिग्रस ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. रोशन राठोड यांना जबर मार लागला आहे. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला यवतमाळ शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. या प्रकरणी दिग्रस पोलिसांनी घटनेचा पंचनामा करीत अज्ञात वाहनाचा शोध सुरू केला आहे. मृतकाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. मृतकाच्या पश्चात आई, वडील व एक भाऊ असा परिवार आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे. या प्रकरणी दिग्रस पोलिसात अज्ञात वाहनावर गुन्ह्याची नोंद करीत पुढील तपास पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसेंजित जाधव, रमेश जाधव, मिथुन जाधव करीत आहेत.

Post a Comment

0 Comments