धामणगाव देव यात्रा महोत्सव : नंदेश उमप आणि ८० कलावंत सादर करणार मराठमोळा रंग सोहळा

ना. संजय राठोड यांच्या संकल्पना ; 'मी मराठी' संगीतमय सांस्कृतिक कार्यक्रम बुधवारी

यवतमाळ : दारव्हा तालुक्यातील धामणगाव देव येथे भगवान मुंगसाजी महाराज पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त श्री मुंगसाजी महाराज संस्थान मुख्य दरबारच्या वतीने ५ व ६ मार्च रोजी यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड हे या यात्रा महोत्सवावर विशेष लक्ष ठेवून आहेत.

ना. संजय राठोड यांच्या संकल्पनेतून यात्रा महोत्सवानिमित्त 'मी मराठी' संगीतमय सांस्कृतिक कार्यक्रम बुधवारी, ५ मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी ७ वाजता गायक नंदेश उमप निर्मित मराठमोळा रंग सोहळा कार्यक्रमात ८० कलावंत महाराष्ट्राचे ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक वैभव उलगडणार आहेत. यात्रा महोत्सवास येणाऱ्या भाविकांना महाराष्ट्राच्या  वैभवशाली परंपरेचे दर्शन व्हावे यासाठी गायक नंदेश उमप निर्मित ' मी मराठी ' या सांस्कृतिक कार्यक्रमाचे विशेष आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात नृत्य, संगीत, गीत, संवाद, पोवाडे, नाट्यकृतीच्या आविष्कारातून महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा अनुभवता येणार आहे. भगवान मुंगसाजी महाराज यात्रा महोत्सवासाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर भाविक येतात. भाविकांची होणारी गर्दी पाहता दर्शन रांगेसाठी बँरीगेट्स, भाविकांना शुद्ध पिण्याचे पाणी, पुरेशा प्रमाणात स्वच्छता गृह, भाविकांसाठी एसटी बसेसचे नियोजन, आरोग्यसुविधा आदींची चोख व्यवस्था करण्याच्या सूचना पालकमंत्री संजय राठोड यांनी प्रशासनास दिल्या आहेत. हा यात्रा महोत्सव पर्यावरणपुरक व्हावा यासाठी प्लास्टिक पिशव्यांचा वापर होऊ नये. परिसर स्वच्छ राहण्यासाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांना सफाईने क्षेत्र वाटून देण्यात यावे. पोलीस विभागाने गर्दीचे योग्य व्यवस्थापन करावे. परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासोबतच वाहनांसाठी पार्किंगचे नियोजन करण्याचे निर्देशही पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले आहेत. या दोन दिवसीय यात्रा महोत्सवात आणि पालकमंत्री संजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असलेल्या गायक नंदेश उमप यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री मुंगसाजी महाराज संस्थान मुख्य दरबारचे अध्यक्ष हरिभाऊ अंबोरे, उपाध्यक्ष रामहरी अंबारे, सचिव गजानन अंबोरे व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.


Post a Comment

0 Comments