‘त्या’ ठाणेदारावर कारवाई करा; डिलेव्हरी बॉयला मारहाण केल्याचे प्रकरण

मनसेची मागणी : पोलिस अधिक्षकांना निवेदन


यवतमाळ : आर्णी पोलिसांनी धाड टाकुन ताब्यात घेतलेल्या दारु विक्रेत्याचा संशयास्पद मृत्यूचे प्रकरण ताजे असून, सिआयडी मार्फत चौकशी सुरु आहे. काल आर्णीच्या ठाणेदाराने एका डिलेव्हरी बॉयला दमदाटी करुन मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या प्रकाराने चांगलीच खळबळ उडाली आहे. त्यामुळे आर्णीच्या ठाणेदारावर कारवाई करावी अशी मागणी मनसेने केली आहे. या बाबतचे निवेदनही जिल्हा पोलीस अधिक्षक कुमार चिंता यांना दिले आहे.

मोबाइलवरून संभाषण करतांना 'सर' न म्हटल्याच्या कारणावरून एका डिलेव्हरी बॉयला अश्लिल शिवीगाळ करुन दमदाटी केली. तो कार्यरत असलेल्या प्रतिष्ठानात जात त्या डिलेव्हरी बॉयला बेदम मारहाण देखील करण्यात आली. धिरज गेडाम रा. आर्णी असे मारहाण झालेल्या डिलेव्हरी बॉयचे नाव आहे. सनराईज लॉजिस्टीक कंपनी नामक कुरीअरमध्ये कार्यरत असून, पार्सल पोहोचविण्याचे काम करतो. नेहमीप्रमाणे तो त्याच्या प्रतिष्ठानात बसून ज्यांचे कुरीअर आले आहे, त्यांना कॉल करीत होता. एका कुरीअरवर केशव ठाकरे असे नाव आणि मोबाइल क्रमांक नमूद होता. तेंव्हा त्या मोबाइलवर कॉल करीत आपण केशव ठाकरे बोलता का, अशी विचारणा केली. तेंव्हा ठाणेदार केशव ठाकरे यांनी केशव ठाकरे काय तुझा नोकर आहे का, कुणाशी बोलतोय तू तुला माहिती आहे का, मी इथंला ठाणेदार आहे, असे सांगत दमदाटीची भाषा केली. डिलीव्हरी बॉयने सर न म्हटल्याने ठाणेदारांनी मारहाण केली. या घटनेची सखोल चौकशी करून ठाणेदारावर योग्य ती कारवाई करावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना तीव्र आंदोलन करेल असा इशारा दिला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांना निवेदन देतांना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने करण्यात आली. या प्रसंगी मनसे विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष अभिजीत नानवटकर, मनसे शहरध्यक्ष अमित बदणोरे, प्रथमेश पाटील, साईराम कवडे, साहिल जतकर, अमितेश आडे यांच्या सह समस्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. 


Post a Comment

0 Comments