ब्रेकींग न्युज : खुनातील आरोपीची आत्महत्या : लहान भावाची केली होती हत्या


यवतमाळ : मोटार सायकल वापरण्याच्या कारणावरुन मोठ्या भावाने फावड डोळ्यावर मारुन लहान भावाची हत्या केल्याची घटना २८ मार्च रोजी शेंबाळपिंप्री येथे घडली होती. या प्रकरणी पुसद तालुक्यातील खंडाळा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हा पासून आरोपी फरार होता. दरम्यान आरोपीने झाडाला दोरखंडाने फाशी घेवून आत्महत्या केली. ही घटना आज ३१ मार्च रोजी सकाळी विदर्भ-मराठवाड्याच्या सिमेवर असलेल्या कळमनुरी येथे उघडकीस आली.

मनिष जयवंत शिरपुले वय २३ रा शेंबाळपिंप्री असे  आत्महत्या केलेल्या आरोपीचे नाव आहे. मनिषने घेतलेली दुचाकी दुरुस्त करुन लहान भाउ दिनेश शिरपुले हा वापरत होता. सदर दुचाकीवरुन त्याच्यात वाद होत होते. दरम्यान शुक्रवारी २८ मार्च रोजी रात्री ८.३० ते ९ वाजताच्या सुमारास आरोपी मनिषने मृतक दिनेश याला जमिनीवर खाली पाडले. त्यानंतर फावड्याने डोक्यावर घाव घालुन दिनेशची निघृण हत्या केली. लहान भावाची हत्या करुन आरोपी घटनास्थळावरून पसार झाला होता. या घटनेची माहिती मिळताच खंडाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार देविदास पाटील व पोलीस कर्मचा-यांनी घटनास्थळ गाठुन पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला होता. या प्रकरणी खंडाळा पोलिसांनी आरोपी मनिष शिरपुले याच्यावर गुन्हा दाखल केला करुन आरोपींची शोध मोहिम सुरु होती.

कळमनुरीत दाखवले मोबाईल लोकेशन

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील शेंबाळपिंप्री हे गाव विदर्भ व मराठवाड्याच्या सिमेवर आहे. शेबांळपिंप्री गावापासून काही अंतरवर हिंगोली तालुक्यातील कळमनुरी हे गाव आहे. या गावालगत असलेल्या कळमनुरी परिसरात आरोपी मनिष याचे मोबाईल लोकेशन दिसत होते. त्या ठिकाणी खंडाळा पोलिसांनी त्या परिसरात जावुन आरोपींचा शोध घेतला. मात्र आरोपी पोलिसांच्या हाती लागला नाही.

झाडाला फाशी घेवून आत्महत्या

आज दि. ३१ मार्च २०२५ रोजी सकाळी दिनेशची हत्या करणारा मनीष हा कळमनुरी परिसरातील एका टेकडीवर आहे अशी माहिती खंडाळा पोलिसांना मिळाली होती. त्यावरुन खंडाळा पोलीस स्टेशनचे पिएसआय कायंदे, गोपाल पांडे हे त्या ठिकाणी गेले. कळमनुरी स्थानिक पोलिसांची मदत घेऊन किंचाळेश्वर महादेव मंदिराच्या मागे दत्त मंदिर टेकडी जवळ पोहचले. यावेळी दिनेशची हत्या करणारा आरोपी मोठा भाऊ मनीष शिरपुले याने फाशी घेवून आत्महत्या केल्याचे समोर आले. कळमनुरी पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला. पुढील तपास कळमनुरी पोलिस करीत आहे. या घटनेची वार्ता पसरताच शेंबाळपिंप्री येथे शोककळा पसरली आहे.

Post a Comment

0 Comments