यवतमाळ : "वडिलांच्या निधनानंतर कुटुंबियांवर दुख:च आभाळ कोसळलं. घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची. हातावर आणून पानावर खाणे हा दिनक्रम. अशा परिस्थितीत जगणं हीच समस्या निर्माण झाली आहे. गेल्या वर्षांभरापासून शासकीय प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर नियुक्तीची घोडे नेमके अडले कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी, नियुक्ती द्या अन्यथा आत्मदहनाची परवानगी द्या अशी मागणी अनुकंपा धारक २९ वर्षीय युवकाने केली आहे. या संदर्भातले स्मरण पत्र अमरावती कामगार विभागाचे उपायुक्त यांना पाठवले आहे.
गोवर्धन गजानन गुल्हाणे (वय २९, रा. सावर ता. बाभुळगाव) असे अनुकंपा धारकाचे नाव आहे. गोवर्धन यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर आजतागायत अनुकंपा नियुक्ती प्रलंबित आहे. गोवर्धनचे वडील गजानन विष्णु गुल्हाणे हे (सुरक्षारक्षक) ३३ के व्ही सावर सबस्टेशन, उप विभाग बाभूळगाव येथे आपल्या एजन्सी मार्फत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. परंतु दिनांक २१-१२-२०२३ रोजी त्यांचे अकस्माक निधन झाले. त्या घटनेनंतर गोवर्धन यांनी संबंधित कार्यालयात अनुकंपा नियुक्तीसाठी सर्व आवश्यक कागदपत्रे सादर केली. पात्रता, मैदानी चाचणी, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनही फक्त संबंधित मंडळाच्या अध्यक्षांची अंतिम सही प्रलंबित होती. तब्बल १६ महिने झाले, तरी त्यांची नियुक्ती झालेली नाही. कामगार मंडळाचे अध्यक्ष वारंवार बदलले. नवीन आलेल्या अधिकाऱ्यांनीही जबाबदारी स्वीकारण्याऐवजी "नवीन GR लागू करा" अशा कारणांवर वेळकाढूपणा चालवला.
गोवर्धन यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित अधिकाऱ्यांनी फाईल पाहूनही कोणतीही स्पष्टता दिली नाही आणि "सही करणार नाही" असेही थेट सांगितले. त्यामुळे १६ महिन्यांपासून नोकरीपासून वंचित असलेल्या गोवर्धनने आता आत्मदहन करण्याचा मार्ग स्विकारला आहे. यासाठी प्रशासनाला स्मरण पत्र देत थेट आत्मदहनाची परवानगीच मांगीतली आहे. यामध्ये गोवर्धन गुल्हाने मु पो सावर ता बाभूळगाव जि. यवतमाळ , विजय जाधव जिल्हा अकोला, दीपाली देवेंद्र सोनोने, उर्मिला पाटील यवतमाळ, संगीता इंगळे बार्शीटाकली अकोला, तेजस्विनी भटकर तेल्हारा अकोला, विष्णू टाले अकोला यांचा समावेश आहे. शासनाने नियुक्ती करावी अन्यथा आत्मदहनाची परवानगी मागितली आहे.
0 Comments