यवतमाळ : मराठा समाजाच्या एकीचा जागर घालणाऱ्या आणि सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक विषयांवर जनजागृती करणाऱ्या ‘जिजाऊ रथयात्रा 2025’ अंतर्गत ‘मराठा जोडो अभियान’ सध्या महाराष्ट्रभर सुरू आहे. मराठा सेवा संघ या नोंदणीकृत सार्वजनिक संस्थेच्या पुढाकाराने राबवण्यात येणाऱ्या या ऐतिहासिक उपक्रमाचे 9 एप्रिल रोजी यवतमाळमध्ये उत्साही स्वागत होणार आहे.
गेल्या 35 वर्षांपासून परिवर्तनवादी, प्रगतिशील आणि सकारात्मक कार्य करणाऱ्या मराठा सेवा संघाच्या नेतृत्वाखाली रथयात्रा राज्यातील सर्व जिल्ह्यांत जनजागृती करत आहे. कोकणातील काही भाग वगळता संपूर्ण महाराष्ट्रभर 45 दिवसांची ही यात्रा जनतेशी थेट संवाद साधत चाललेली आहे. यात्रेचे यवतमाळमध्ये आगमन 9 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता लोहारा चौक येथे होणार आहे. त्यानंतर एक भव्य मोटरसायकल रॅली पुढील मार्गाने मार्गक्रमण करणार आहे. जिजामाता चौक (एकविरा चौक) – दर्डा नाका – संविधान चौक – शिवतीर्थ – समता मैदान – स्टेट बँक चौक. यानंतर रात्री 8 वाजता भातृमंडळ सभागृह,संदिप मंगलमजवळ, यवतमाळ येथे समारोपीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.10 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता महात्मा फुले पुतळा येथे माल्यार्पण व अभिवादन करून यात्रा डॉ. पंजाबराव देशमुख चौक (तहसील चौक), कळंब चौक मार्गे पुढे वणीकडे मार्गस्थ होणार आहे. या यात्रेमध्ये सहभागी होण्याचे आणि समाजासाठी ऐक्याच्या बळावर नव्या परिवर्तनाची चळवळ उभी करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या उपक्रमात मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड, जिल्हा सचिव शशिकांत खडसे, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा निशाताई बुटले, सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे संयोजक प्रा. सुनील कडू, तसेच नंदकुमार बुटे, सतीश काळे, पुंडलिक बुटले, प्रवीण भोयर, महेंद्र वेरुळकर,आणि किशोर चव्हाण यांनी उपस्थित राहण्याचे तसेच सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन केले आहे.
यात्रेची उद्दिष्टे व विषय: संविधान, कायदे व हक्क यांविषयी जनजागृती धार्मिक-राजकीय उन्माद टाळण्यासाठी संवाद शेतकरी समस्या व त्यावरील उपाय शिक्षण, रोजगार आणि युवकांसाठी मार्गदर्शन महिला सक्षमीकरण आणि शासकीय योजना, भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीविरोधी लोकजागृती कुटुंबसंस्था व पारंपरिक मूल्यांची जपणूक
0 Comments