यवतमाळ : माणसाला माणसात आणणाऱ्या संपूर्ण
मानवी समाजाला समता,
स्वातंत्र्य आणि बंधुत्वाची शिकवण देणाऱ्या महामानव, क्रांतीपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण जगात मोठ्या
उत्साहात साजरी करण्यात आली. लंडनमधील चिपरफिल्ड हॉलमध्ये बुध्दिस्ट आंबेडकराईट मैत्री
संघ युके व्दारा आयोजित जयंती उत्सव 2025 मोठ्या उत्साहात साजरी
करण्यात आली.
क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या 198 व्या आणि विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त विविध आकर्षक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात लेझीमच्या तालावर महामानवांना मानवंदना देण्यात
आली. जयभीमच्या जयघोषाने संपूर्ण हॉल निनादून गेला. लहान मुलांनी सुमधूर आवाजात त्रिशरण, पंचशील,
बुध्दवंदना आणि धम्मपालनगाथा पालि आणि इंग्लिश भाषेमध्ये
सादर केल्या. तर मोठ्यांनी बुध्द, धम्म, संघ वंदना, तसेच भीम संकल्प सादर केला. सुप्रसिध्द पास्को फुड्स हे ह्या जयंती
उत्सवाचे मुख्य प्रायोजक होते. तर थ्रिपेझी, इस्टोरेफुझन, टेस्टलाईफ,
एमेथिस्ट आणि इम्पॅथी सोलुशन ह्या कंपण्यांनी ह्या
कार्यक्रमाचे सहप्रायोजन केले.
बुध्दिस्ट आंबेडकराईट मैत्री संघ युके ह्या
संघटनेतर्फे नेहमीच लहान मुलांना आंबेडकरी आणि बुध्द धम्माचे संस्कार आणि परंपरा देण्याचा
प्रयत्न सतत करीत असते. ह्या जयंती कार्यक्रमात महमानवांच्या जीवनावर नृत्य सादर करण्यात
आले. लहान बालक,
उपासक, उपासिका यांना त्यांच्या गुणांची चुणूक दर्शविण्याची
संधी देत असते. ही संघटना लंडनमध्ये स्थायीक झालेल्या कुटुंबांना एकत्र आणून आपल्या
सांस्कृतिक आणि वैचारिक वारसा जपण्याचा प्रयत्न सातत्याने करीत आहे. ह्या जयंती कार्यक्रमात
यवतमाळ येथील इंजि. गिरीश गोपीचंद कांबळे यांचे कुटुंब प्रामुख्याने सहभागी झाले होते.
'सिध्दूस टाईमबॉम्ब' ह्या लघुपटाचे ट्रेलर रिलिज
या जयंतीमध्ये इंजि. गिरीश कांबळे दिग्दर्शित
'सिध्दूस टाईमबॉम्ब' ह्या लघुपटाचे ट्रेलर रिलिज करण्यात आले. लंडन
येथील जयंती कार्यक्रमाला इंग्लंडच्या विविध भागातून आंबेडकरी बुध्दिस्ट लोक प्रामुख्याने
हजर झाले होते. इंग्लंडमधील स्कॉटलंड आणि वेल्स या देशातून सुध्दा लोक हजर झाले होते. बहुजनांना शेकडो वर्षे गुलामीत जोखडबंद ठेवण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांच्यामुळे बहुजनांना त्यांच्या गुणवत्तेप्रमाणे काम करण्याची संधी मिळाली.
म्हणून 'उध्दरली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे' म्हणत 'आम्ही खाते त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हायं रे' ह्याची जाण ठेवत इंग्लंडमधील अनेक डॉक्टर्स, इंजिनिअर्स,
पी. एचडी. होल्डर्स, स्टूडंट्स सातासमुद्रापार जाऊन प्रस्थापित झाले. समाजाचे उत्तरदायित्व म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर
आणि इतर महामानवांचे विचारांचा प्रसार व प्रचार करीत आहे.
0 Comments