मोटारसायकल प्रभात रॅली, कांतारा चित्रपटातील भूतकोला नृत्य, अयोध्येतील रामलल्लाची प्रतिकृती, शिवतांडव व महादेवाची वरात, 12 फुट बाहुबली बजरंगबली, लक्ष्मी, बालाजी, नृसिंह यासह एकूण 90 झांक्याचे प्रमुख आकर्षण
श्रीराम नवमी शोभायात्रा समितीच्या वतीने आयोजीत या शोभायात्रेसाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, दुर्गा वाहिनीचे कार्यकर्ते जोरात तयारी करीत आहे. भारतीय संस्कृती, लोकपरंपरा, शक्ती आणि भक्ती यासोबतच विविध सामाजिक विषयांवर प्रबोधन करणारी ही अनोखी शोभायात्रा ठरणार आहे. यवतमाळच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि धार्मिक वैभवात भर घालणारी शोभायात्रा यवतमाळचा लोकोत्सव झाला असुन श्रीराम नवमी शोभायात्रा समितीने त्यादृष्टीने संपुर्ण नियोजन आखले आहे. रामनवमी शोभायात्रा आकर्षक आणि आदर्शवत अशीच होईल, याकरीता शेकडो रामभक्त विविध समित्यांद्वारे झटत आहे. श्रीरामनवमी दिनाची सुरुवात रामजन्मोत्सव शोभायात्रा समितीच्या वतीने भव्य मोटारसायकल प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आलेले आहे. श्री दत्त मंदिर, दत्त चौक, येथून या मोटारसायकल रॅलीला सकाळी 7.00 वाजता सुरुवात होईल. शहाराच्या विविध भागातून श्रीरामनामाची धून वाजवत रामभक्त युवक मार्गक्रमण करतील. या प्रभातफेरीचे समापन जयहिंग चौकातील श्रीराम मंदिरात होईल. त्यानंतर जयहिंद चौकातील श्रीराम मंदिरातून श्रीराम, माता सिता आणि लक्ष्मणाच्या मुर्तीचे विधिवत पूजन करुन या शोभायात्रेला दुपारी 3.00 वाजता प्रारंभ होईल. यंदा साकारण्यात आलेल्या श्रीरामरथामध्ये रामदरबार विराजीत असणार आहे. हा रामरथ रामभक्तांद्वारे शोभायात्रा मार्गावर हाताने ओढण्यात येणार आहे. महिला-पुरुष, आबालवृध्दांच्या या सर्वसमावेशक शोभायात्रेत विविध प्रांतातील कलापथक सहभारी होणार आहे.
यंदाचे मुख्य आकर्षण कर्नाटकातील भूतकोला नृत्य असणार आहे. कांतारा या चित्रपटात याच भूतकोला नृत्त्यावर कथानक आहे. कन्नड मधील या अनुष्ठानिक कलेत दैव नर्तक म्हणजेच देवाची वेशभूषा केलेला व्यक्ती नृत्त्य करतो. त्याच कलेचे प्रदर्शन यवतमाळकरांना अनुभवता येणार आहे. शोभायात्रेत अयोध्येतील रामलल्लाची प्रतिकृती, प्रभू श्रीरामांचे प्रिय भक्त्त हनुमानाची 12 फुट उंच महाबली रुपातली वेशभूषा केलेले कलावंत लक्ष वेधतील. चैत्र नवरात्री निमित्त महाकालीसह नऊ देवींचे नृत्य, महादेवाचे तांडवनृत्य, भोलेबाबांची वरात आणि शिव-पार्वती नृत्य, मथुरा येथील राधा-कृष्ण नृत्य पथक, नृसिंह भगवान, आंध्र प्रदेशातील लक्ष्मी-बालाजी दर्शन, तसेच उज्जैन येथील महाकाल पुजेतील प्रसिध्द डमरु वाद्य आणि अप्रतिम कलाविष्कार लक्ष वेधून घेतील. भक्ती, अभिनय, नृत्य आणि श्रृंगार याची अनुभूती या कलापथकातून होणार आहे.
पारंपारिक नृत्य
यासोबतच पारंपारीक आदिवासी दंडार नृत्य सादर करणारे 20 जणांचे कलापथक, बंजारा संस्कृतीची झलक दर्शविणारे लेंगी नृत्य, 100 जणांचे लक्षवेधी भजनी मंडळ, कोलाम पोडांवरील डफ वाजविणारे 20 जणांचे पथक, विविध रामायलकालीन चलचित्र देखावे तसेच सामाजिक प्रबोधन करणाऱ्या आणि भारतीय संस्कृतीची झलक दर्शविणाऱ्या 90 हून अधिक झांक्या या शोभायात्रेत सहभागी होणार आहे. स्थानिक व्यायामशाळा व आखाड्यांध्मील बंदाट्या याद्वारे बलदंड युवकांचे प्रदर्शन बघायला मिळेल.
भगवे, ध्वज व पताका लावणार
शोभायात्रा मार्गावर ठिकठिकाणी रांगोळी, भगवे ध्वज, पताका लावण्यात येणार असुन भजन गायनाचे कार्यक्रम देखील आयोजीत करण्यात आले आहे. रामभक्तीमय वातावरणात निघाणाऱ्या या शोभायात्रेच्या स्वागताची जय्यत तयारी यवतमाळकरांनी केली असुन शहरात श्रीरामांच्या प्रतिमा, भगवे ध्वज, पताका आणि फलक झळकत आहेत.
समित्या गठीत
पारंपारीक मार्गावरुन आयोजीत शोभायात्रेच्या आयोजनासाठी विविध समित्यांचे गठन करण्यात आले असुन सुरक्षा समितीत बजरंग दलाच्या 1000 सुरक्षा रक्षकांचा समावेध आहे. जयहिंद चौक श्रीराम मंदिरातून सुरु होणाऱ्या शोभायात्रेचे समापन संत सेना चौकात महाआरती नंतर होणार आहे.
झाँकीला पारितोषक
यावेळी उत्कृष्ट चित्ररथ व झाँकीला पारितोषिक वितरण करण्यात येईल. प्रथम क्रमांच्या झांकीला रु.21,000/-, द्वितीय क्रमांकाला रु.11,000/- तर तृतीय क्रमांकाला रु.5,000/- एवढी रक्कम बक्षीस स्वरुपात देण्यात येणार आहे. यवतमाळकर नागरिकांनी मोठ्या संख्येने या शोभायात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा समितीने केले आहे. यावेळी पत्रकार परिषदेला राम लोखंडे, संतोष हरनखडे, मनोज ऑदर्य, गोविंद मोर, विवेक सजणावर, अभिजित डोंगरे, अमोल ढोणे, राजू खंडाळकर, राजू पडगीळवार, देवा राऊत, गौरव सूचक, विनोद सानप, राहुल ढोके, लाला शहा, ईश्वर पिसे, अश्विन बोपचे उपस्थित होते.
0 Comments