अमरावती ( प्रतिनिधी) : अ. भा. आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळाचे सहावे ग्रामीण आंबेडकरी साहित्य संमेलन हिवरा (बु), ता. नांदगाव खंडेश्वर येथे दिनांक ११ एप्रिल रोजी आयोजित करण्यात येणार आहे. संमेलनाध्यक्षपदी डॉ. नंदा तायवाडे तर उद् घाटकपदी प्रा. विलास भवरे यांची निवड करण्यात आल्याची माहिती महामंडळाचे निमंत्रक प्रशांत वंजारे यांनी दिली आहे.
अलिकडच्या दशकात ग्रामीण भागातील समस्यांनी उग्र रूप धारण केले असून सामान्य ग्रामीण माणूस हतबल झाला आहे. ग्रामीण माणसांच्या असंतोषाला संघटित स्वरूप देऊन त्याला विधायक वळण देणे गरजेचे आहे. याकामी साहित्य हे महत्त्वाची भूमिका बजावू शकते. ग्रामीण परिसरातील सर्जनशीलता वाढीस लागावी, ग्रामीण कलावंतांना विचारमंच उपलब्ध व्हावा आणि सरकारी अनास्थेमुळे ग्रामीण भागात निर्माण झालेल्या समस्यांवर चर्चा व्हावी यासाठी सदर संमेलनाचे आयोजन करण्यात आले अशी माहिती प्रशांत वंजारे यांनी दिली.
संमेलनात दिवसभर भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून त्यात कथाकथन, विधान चर्चा, कवी संमेलन, एकपात्री नाट्य प्रयोग, परिसरातील कार्यकर्त्यांचा सन्मान आदी कार्यक्रमांचा समावेश आहे. संमेलनात डॉ. वामन गवई, डॉ. भास्कर पाटील, डॉ. सिद्धार्थ वाठोरे, प्रा. विक्रांत मेश्राम, भाऊ भोजणे, डॉ . सीमा मेश्राम, संजय शेजव आदी मान्यवर सहभागी होणार आहेत. संघर्ष युवक मंडळ हिवरा (बु) ही सदर संमेलनाची आयोजक संस्था आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष रोशन रामटेके असून मुख्य संयोजक नयन मेश्राम आहेत. संमेलनाला उपस्थित राहून सहकार्य करण्याचे आवाहन प्रशांत हजारे, राजेश मेश्राम, प्रविण मोखळे, मयुर मेश्राम, आशीष मेश्राम, प्रविण बडगे, नितीन सरदार, विवेक डोंगरे आदींनी केले आहे.
0 Comments