महागाव शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांची होणार चौकशी : पथकाची नियुक्ती : मनसेचा दणका


यवतमाळ : महागाव परीक्षा केंद्र चालकांकडून कॉपी मुक्तीच्या नावावर पैसे वसुल करणाऱ्या शिक्षण विस्तार अधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी मनसेने केली होती. त्याची दखल घेत याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी जिल्हा शिक्षण विभागाकडून चौकशी समिती नेमण्यात आली आहे.

महागाव शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी विजय बेतेवाड यांनी तालुक्यातील दहावी व बारावीच्या परीक्षा केंद्र चालकांकडून कॉपी मुक्तीच्या नावावर परीक्षा केंद्रांवर भेटी देवून उद्याचा तुमचा पेपर कडक केल्या जाईल त्यासाठी योग्य तो पर्याय म्हणजे तुम्हाला योग्य ती रक्कम द्यावी लागेल अशी दमदाटी करून शिक्षक व केंद्र चालकांकडून वसुली केली. या प्रकाराची सखोल चौकशी करून केंद्र चालकांकडून वसुली करणाऱ्या शिक्षण विस्तार अधिकारी व कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनसे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार , मनविसे मा. जिल्हाध्यक्ष अनिल हमदापुरे यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे निवेदनाद्वारे केली होती .

यानिवेदनाची दखल घेत जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथ) प्रकाश मिश्रा यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नियुक्त केली. या समिती मध्ये अध्यक्ष म्हणुन निता गावंडे (उप. शिक्षणाधिकारी प्राथ जि. प.यवतमाळ), सदस्य पोपेश्र्वर भोयर (गटशिक्षणाधिकारी प.स.यवतमाळ), प्रणिता गाढवे (विस्तार अधिकारी शिक्षण विभाग जि. प.यवतमाळ), स्वप्निल भांगे (क. स. पंचायत समिती महागाव) यांचा समावेश आहे. ही समिती लवकरच या प्रकाराची चौकशी करणार असल्याने तालुका शिक्षण विभागात खळबळ उडालीआहे. या प्रकाराची निःपक्ष चौकशी झाल्यास शिक्षण विभागातील अनेक काळे कारनामे उघडकीस येणार असल्याने शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी, संस्था चालक यांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणात संबंधित शिक्षण विस्तार अधिकारी सोबतच त्यांना वसुलीसाठी मदत करणाऱ्या सहकारी कर्मचाऱ्यांची पण चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी मनसेने केली आहे.


Post a Comment

0 Comments