नव्या पर्यायी जगाची निर्मिती हेच आंबेडकरी साहित्याचे ध्येय : डॉ. नंदा तायवाडे : सहाव्या ग्रामीण आंबेडकरी साहित्य संमेलनाचा उत्साहात प्रारंभ

अमरावती : जीवनाच्या सर्व क्षेत्रात अराजकाची स्थिती आहे. माणूस हतबल झाला आहे. त्याच्या जीवन जाणीवा स्तंभित आणि बोथट झाल्या आहेत. धर्म माणसांवर स्वार झाला असून सामाजिक वातावरण  दूषित झाले आहे.

अशा काळात साहित्यिकांना जोखीम उचलावी लागेल. वर्तमानाच्या धर्मांध पर्यावरणात सातत्याने जागता पहारा देवून डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने नव्या पर्यायी जगाची निर्मिती करावी असे आवाहन डॉ. नंदाताई तायवाडे यांनी केले. त्या हिवरा बुद्रूक ता. नांदगाव (ख) येथे आयोजित अ.भा. आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळाच्या सहाव्या ग्रामीण आंबेडकरी साहित्य  संमेलनात संमेलनाध्यक्ष म्हणून बोलत होत्या. संमेलनाचे आयोजन संघर्ष युवक मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले होते. विचारमंचावर यावेळी उद् घाटक पथनाट्यकार प्रा. विलास भवरे, अतिथी रविंद्र मुंद्रे, कवी प्रभाकर गंभीर, प्रकाश रामटेके, उदईकार प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते.

उद्घाटक पथनाट्यकार प्रा. विलास भवरे म्हणाले, बाबासाहेबांनी खेड्यापाड्यातील जग आपल्या साहित्यातून आविष्कृत करण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. एकेकाळी भरास असलेली आणि लोकप्रिय असलेली आंबेडकरी पथनाट्य, नाट्य चळवळ मागे पडली आहे. दर्जेदार नाटके लिहिली जात नाही, लिहिली गेली तर ती सादर केल्या जात नाहीत. ही गंभीर समस्या आहे. येणाऱ्या काळात या दृष्टीने काम करण्याची गरज असून आंबेडकरी नाट्य संमेलने आयोजित केली गेली पाहिजे.  तेव्हाच नवनवीन आंबेडकरी कलावंत निर्माण होतील.

संमेलनाचे अतिथी डॉ. रविंद्र मुंद्रे म्हणाले, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी साहित्याकडून आणि  साहित्यिकांकडून जी अपेक्षा व्यक्त केली होती तसे साहित्य आणि साहित्यिक निर्माण केले पाहिजे. निर्माण झाले पाहिजे. साहित्य ही महत्त्वाची  कृती असून त्यातून लोकांचे जीवन प्रतिबिंबित झाले पाहिजे. आंबेडकरी साहित्य हे जीवनवादी आहे. ते अपौरुषेय नाही. साहित्याचे सृजन आणि जतन झाले पाहिजे. साहित्यिकांनी आणि कार्यकर्त्यांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे. साहित्यातून समतेचा प्रवाह वृद्धिंगत झाला पाहिजे. क्रांती ही बुद्धिजीवी वर्ग करतो. त्यामूळे बुद्धिजीवी आणि बुद्धिवादी समूहाची जबाबदारी मोठी आहे.

अतिथी प्रकाश चव्हाण यांनी समयोचित भाषण केले. महामंडळाची भूमिका डॉ. सीमा मेश्राम यांनी मांडली. प्रास्ताविक मुख्य संयोजक नयन मेश्राम यांनी केले. संचालन एकनाथ रंगारी यांनी केले तर आभार मोनाली नन्नावरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेश मेश्राम, प्रवीण मोखळे, मयूर मेश्राम, आशिष डोंगरे,क्षितिज गडलिंग, गुणराज भगत, प्रज्ञा सवाई, वर्षाताई गरुड, राजेश गरुड आदींनी  परिश्रम घेतले.

ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असणारा कृषी व्यवसाय सरकारच्या नाकर्तेपणामुळे आणि भांडवलशाही धार्जीण्या धोरणाने पुर्णपणे मोडीत निघाला आहे. शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. धर्मांधतेचे लोण ग्रामीण भागात पोहोचले असून ग्रामीण माणसांच्या मूळ समस्या अदखलपात्र ठरवण्यात आल्या आहेत. त्यामुळे एका नव्या संघर्षाची सुरूवात करण्याची गरज असून फॅसिझम विरूद्ध लढण्यासाठी ग्रामीण माणसाने स्वतः ला तयार करावे.  धर्मांधते विरूद्धच्या लढाईत आंबेडकरी साहित्य शस्त्र आणि शास्त्र म्हणून उपयोगात येईल.

प्रशांत वंजारे 

निमंत्रक 

अ. भा. आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळ

Post a Comment

0 Comments