यवतमाळ – दिग्रस शहरातील आरक्षित आणि ग्रीन झोनमधील नऊ अनधिकृत ले-आऊटची मान्यता रद्द झाल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या प्रकरणी आता विशेष तपासणी पथक (एस.आय.टी) तर्फे चौकशी सुरू आहे. या प्रकरणात सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करणाऱ्या या ले-आऊट धारकांवर नियमांप्रमाणे कारवाई होईलच. या ले-आऊटमध्ये प्लॉट खरेदी केलेल्या, घर बांधून राहायला गेलेल्या नागरिकांनी घाबरून जावू नये, असे आवाहन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले आहे.
दिग्रसमधील अनधिकृत ले-आऊटचा मुद्दा विधिमंडळात उपस्थित झाल्यानंतर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी या प्रकरणी एसआयटी चौकशीची घोषणा करून, नगर परिषदेच्या दोन अधिकाऱ्यांना निलंबितही केले. या प्रकरणी चौकशीनंतर नऊ ले -आऊटची मान्यता रद्द करण्यात आल्याने या ले-आऊटमध्ये आपल्या आयुष्याची जमापूंजी देवून प्लॉट खरेदी करणाऱ्या प्लॉटधारकांना मोठा धक्का बसला आहे. अनेकांनी या प्ररकणी न्याय मिळावा म्हणून दिग्रसचे आमदार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांची भेट घेवून मदतीची मागणी केली. त्यावेळी पालकमंत्री संजय राठोड यांनी हे प्रकरण चौकशीत आहे. प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे. या प्रकरणात सामान्य नागरिकांची फसवणूक करणाऱ्या ले-आऊट धारकांवर कठोर कारवाई केली जाईल, असे सांगितले. या प्रकरणात दोषी असलेले ले-आऊट मालक, महसूल, नगर परिषद, भूमि अभिलेख, नगर रचना आदी विभागांतील दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांवरही कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले. मात्र या ले-आऊटमध्ये घर बांधण्याचे स्वप्न उराशी बाळगून प्लॉट खरेदी करणाऱ्या सर्वसामान्य प्लॉटधारकांवर अन्याय होवू देणार नाही, अशी ग्वाही यावेळी पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली. या ले-आऊटमधील प्लॉटधारक, ज्यांनी घरे बांधली अशा नागरिकांना घाबरण्याचे कारण नाही. या सर्वांच्या पाठीशी आपण स्वत: उभे राहू, असे ना. संजय राठोड म्हणाले. या प्लॉटधारकांना दिलासा मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर अभ्यास व पाठपुरावा आपण स्वतः करू. मात्र यात दोषी असलेले ले-आऊटधारक आणि त्यांच्याशी संगनमत करून त्यांना मदत करणारे यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी यांच्यावर शासनस्तरावर कठोर कारवाई केली जाईल, असे ना. राठोड यांनी स्पष्ट केले. पालकमंत्री संजय राठोड यांनी ले-आऊटमध्ये फसविल्या गेलेल्या प्लॉटधारकांना त्यांच्यावर अन्याय होवू देणार नसल्याचा विश्वास दिल्याने प्लॉटधारकांनी ना. संजय राठोड यांचे आभार मानले. दिग्रससोबतच जिल्ह्यातही ले-आऊटमधील प्लॉटची खरेदी करणाऱ्यांनी सर्व कागदपत्रांची, शासकीय मान्यतांची खातरजमा केल्यानंतरच भूखंड खरेदीचे व्यवहार करावे, असे आवाहनही पालकमंत्री संजय राठोड यांनी या निमित्ताने जिल्ह्यातील जनतेला केले आहे.
0 Comments